शिरोलीत महापौरांच्या विरोधात शंखध्वनी
By admin | Published: July 29, 2016 12:52 AM2016-07-29T00:52:10+5:302016-07-29T01:03:47+5:30
हद्दवाढीला तीव्र विरोध : तीन आमदारांना पाठिंबा, भाजीपाला, दूध यांसारख्या सुविधा बंद करण्याचा इशारा
शिरोली : हद्दवाढीच्या विरोधात शिरोलीतील कृती समिती आणि सर्व पक्षांच्यावतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत चौकात कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्या विरोधात शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना शासनाने बुधवारी काढण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. हे आमदार सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांना कळल्यानंतर तिघांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन १८ गावांतील ग्रामीण जनतेचा हद्दवाढीला तीव्र विरोध आहे. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचाही विरोध आहे. तरी ग्रामीण जनतेच्या विरोधात जाऊन हद्दवाढीची अधिसूचना शासनाने काढू नये, अशी विनंती या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केली.
यावर अधिसूचना रद्द झाली. बुधवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर अश्विनी रामाणे यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या तिन्ही आमदारांचा निषेध केला. म्हणून शिरोलीतील हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजता शिरोली ग्रामपंचायत चौकात जमून हद्दवाढीच्या विरोधात तीव्र घोषणा देत महापौर अश्विनी रामाणे यांचा निषेध करीत शंखध्वनी आंदोलन केले.
यावेळी कृती समितीचे महेश चव्हाण यांनी आम्हाला हद्दवाढीत या म्हणणाऱ्यांनी शहरातील उपनगरे अगोदर सुधारावीत, मग हद्दवाढ मागा. एकदा शिरोलीत येऊन बघा, तुमच्या शहरापेक्षा आमच्या इथे चांगल्या सुविधा आहेत. शहराला सुविधा मिळत नाहीत, मग आम्हाला काय देणार. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी ग्रामीण जनतेला शहरातील सुविधा देऊ नका, असे वक्तव्य करणारे माजी उपमहापौर बाबा पार्टे यांचा चांगलाच समाचार घेतला.
ग्रामीण जनता आहे म्हणून शहर आहे. आम्ही भाजीपाला, दूध यांसारख्या सुविधा बंद केल्या, तर तुम्ही अडचणीत याल. आम्हाला डिवचाल तर याद राखा, असा इशारा पाटील यांनी दिला
या आंदोलनात ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील, सलीम महात, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, तंटामुक्तचे अध्यक्ष सतीश पाटील, मेडिकल असोसिएशनचे
संचालक प्रल्हाद खवरे, डॉ. सुभाष पाटील, रणजित केळुसकर,
बाजार समिती सदस्य सुरेश पाटील, विजय जाधव, गोविंद घाटगे,
सुनील पाटील, दीपक यादव, विनोद अंची, लियाकत गोलंदाज, शिवाजी खवरे, शिवाजी कोरवी, सागर
कौंदाडे, राजू सुतार उपस्थित होते. (वार्ताहर)
कोल्हापूर शहर कुणा एकट्याचे नाही, उद्या आम्ही शिरोलीकर शहरात येतो. अडवून दाखवा आणि ग्रामीण जनतेला पाणी देऊ नका म्हणणारे बाबा पार्टे शहरात काळम्मावाडीची येणारी पाईपलाईन ही ग्रामीण भागातूनच येत आहे. त्यामुळे शहराचा भविष्यातील पाणी प्रश्न ग्रामीण भागावरच अवलंबून आहे. ग्रामीण जनतेची बससेवा बंद करा म्हणणाऱ्या नेतेमंडळींना माहिती नाही की, केएमटी आजूबाजूच्या खेड्यांमुळे चालली आहे, अन्यथा ती कधीच बंद पडली असती. त्यामुळे ग्रामीण जनतेला भडकवू नका, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी दिला.