मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिमेला शेण फासलं; 'स्वाभिमानी' आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 06:21 PM2018-07-18T18:21:41+5:302018-07-18T18:27:05+5:30
गायीच्या शेणाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला.
कुरुंदवाड : गाय दूध दर अनुदानासाठी शासनाने तिसऱ्या दिवशीही निर्णय न घेतल्याने संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांच्या प्रतिमेला पालिका चौकात गायीचे शेण फासून निषेध व्यक्त केला. आंदोलनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये शासनाने अनुदान द्यावे या मागणीसाठी खा.राजू शेट्टी यांनी दूध बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाची तीव्रता दाखविण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्ते रोज अभिनव पद्धतीने आंदोलन करीत आहेत .
कुरुंदवाड येथील शहर स्वाभिमानी संघटनेच्यावतीने शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील मुख्य मार्गावरून रॅली काढली .रॅलीबरोबर दुध गोळा करून ते शाळेतील मुलांना वाटण्यात आले . फडणवीस सरकारने दूध दराबाबत अद्यापी निर्णय न घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यनी दुपारी पालिका चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला .
या आंदोलनाला पोलिसांनी विरोध केल्याने शाब्दीक चकमक उडाली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनात स्वाभिमानी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासो चौगुले ,बंडू उंमडाळे ,योगेश जिवाजे ,युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्ते सहभागी झाले होते .