सोनतळीच्या आश्रमशाळेत भटक्या विमुक्तांच्या आयुष्याला आकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 10:36 AM2020-02-03T10:36:59+5:302020-02-03T10:38:18+5:30
कोल्हापूर : समाजाकडून अवहेलनाच वाट्याला आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम कोल्हापुरात सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या ...
कोल्हापूर : समाजाकडून अवहेलनाच वाट्याला आलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम कोल्हापुरात सुरू आहे. राजर्षी शाहू महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या सोनतळीच्या माळावरच त्यांच्याच प्रेरणेने महात्मा फुले यांच्या नावाने सुरू असलेल्या आश्रमशाळेने रौप्यमहोत्सवी टप्पा गाठला आहे.
रजपूतवाडी-सोनतळी येथील भटक्या-विमुक्त समाज विकास मंडळाची महात्मा फुले यांच्या नावाने आश्रमशाळा दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी १९९४ मध्ये सुरू केली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सहकार्याने २० मुलांवर आश्रमशाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्थापनेपासून सुरू झालेले पवार यांचे पाठबळ आजही कायम आहे. आज या शाळेत १५ खोल्या आहेत. कोल्हापूरसह मुंबई, सोलापूर, सांगलीतील ४५० विद्यार्थी येथे शिक्षणाचे धडे गिरवीत आयुष्याला आकार देत आहेत. यात ८० मुली आहेत.
येथे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण मोफत दिले जात आहे. निवासी शाळा असल्याने आहार, औषधोपचारांसह शालोपयोगी साहित्यही संस्थेकडून पुरविले जाते. सध्या विज्ञान आणि कला या दोन शाखा आहेत. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या संस्थेची दमदार वाटचाल सुरू आहे. निकालही उत्तम लागतो. या संस्थेत शिकलेले विद्यार्थी आज सैन्य, पोलीस, वैद्यकीय क्षेत्रांत नाव गाजवत आहेत. व्यवसायपूरक शिक्षणाला महत्त्व आल्याने ‘आयटीआय’सारखे कोर्स सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
- बालवाडीपासून प्रेरणा
राजर्षी शाहू महाराज १९०७ च्या दरम्यान सोनतळी येथे वास्तव्यास होते. भटक्या-विमुक्त समाजाला प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कायमच ठोस पावले उचलली. या समाजातील मुलांना शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी सोनतळीला बालवाडी सुरू केली. पुढे भटक्या-विमुक्तांसाठी काम करीत असताना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून झालेल्या मार्गदर्शनातून येथेच आश्रमशाळा उभारण्याची प्रेरणा मिळाली. शरद पवार यांनी मान्यता देऊन या प्रेरणेला अधिक बळ दिले.
- आश्रमशाळेला हक्काची जागा
या शाळेची सुरुवात भाड्याच्या खोलीतून झाली. समाजकल्याण विभागाकडून अनुदानासाठी स्वत:च्या जागेची अट घालण्यात आली. व्यंकाप्पा भोसले यांनी सोनतळी येथे भगवान पाटील यांच्याकडून २० गुंठ्यांची जागा मुलाच्या नावाने खरेदी करून ठेवली होती. शाळेला अनुदान मिळावे म्हणून भोसले यांनी मुलाकडे जागेची मागणी केली. मुलानेही स्वखुशीने ती दिली. अशा प्रकारे शाळेला हक्काची जागा मिळाली.
- आज रौप्यमहोत्सवी कार्यक्रम
रजपूतवाडी येथील आश्रमशाळेच्या कार्यस्थळावर आज, सोमवारी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहू छत्रपती आहेत.
ही शैक्षणिक संस्था असल्याने शिक्षण विभागाकडेच तिची जबाबदारी देणे अपेक्षित आहे; पण समाजकल्याण विभागाकडे आश्रमशाळांची जबाबदारी दिल्याने शैक्षणिक गुणवत्तेसाठी त्यांच्याकडून विशेष लक्ष दिले जात नाही. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
- व्यंकाप्पा भोसले