Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 01:04 PM2024-08-05T13:04:14+5:302024-08-05T13:04:50+5:30
काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ दोन्ही मतदारसंघ काँग्रेस व उद्धवसेनेला सोडले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात पाच जागा मिळाल्या पाहिजेत; त्यातही काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच, असा आग्रह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरला.
प्रदेशाध्यक्ष पाटील हे रविवारी काही काळ कोल्हापुरात आले होते, त्यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विमानतळ येथे त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काँग्रेस व उद्धवसेनेच्या वतीने वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात आहे. पक्षाकडून अद्याप काय करायचे? हे काही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. कोणत्याही परिस्थितीत ‘चंदगड’, ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘कोल्हापूर उत्तर’ व ‘इचलकरंजी’ या जागा पक्षाकडे घ्या, असा आग्रह जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी धरला.
लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नेटाने काम केले. या बळावर, काँग्रेस आता जागावाटपात दबाव वाढवत असेल तर ते ऐकून घेऊ नका, असे काही पदाधिकाऱ्यांनी उघड भूमिका मांडली. यानंतर, पाचही मतदारसंघांत चाचपणी करून तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी आमदार राजीव आवळे, मदन कारंडे, सदानंद माळी, शिवाजी खोत, अमर चव्हाण, अनिल घाटगे, रावसाहेब भिलवडे, आदी उपस्थित होते.
चार दिवसांत पवार यांच्यासोबत पुण्यात बैठक
उद्धवसेना व काँग्रेसच्या पातळीवर विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांच्याकडून जागांबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या चार दिवसांत पुण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे.