कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:48 PM2024-06-11T14:48:51+5:302024-06-11T14:49:31+5:30

चार मतदारसंघात झेंडा फडकवणार

Sharad Pawar group wants another assembly constituency in Kolhapur says V. B. Patil | कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

कोल्हापुरात शरद पवार गटाला आणखी एक विधानसभा मतदारसंघ हवा - व्ही. बी. पाटील 

कोल्हापूर: कोल्हापूर, कागल, चंदगड आणि राधानगरी हे विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काचे आहेत. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले यापैकी एक मतदारसंघ आम्हाला हवा आहे. या चार मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

शरद पवार राष्ट्रवादीच्यावतीने सोमवारी शिवाजी स्टेडियम येथील कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचा २६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. यावेळी पक्षाच्या नव्या आठ खासदारांचे अभिनंदन करतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संघटन कौशल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

व्ही. बी. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे असून या ठिकाणी शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चौथ्या मतदारसंघाबाबत लवकरच पवार यांच्यासासोबत चर्चा केली जाईल. बाराही तालुक्यांचा दौरा लवकरच करणार आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. तर महिला शहराध्यक्ष पदमजा तिवले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सेवा दलाचे शहराध्यक्ष महादेव पाटील यांनी केले.

यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी माने मांगुरकर, सरचिटणीस सुनील देसाई, चंद्रकांत वाकळे, रामराजे कुपेकर, श्रीकांत पाटील, निरंजन कदम, हिदायत मणेर, मुसाबाई कुलकर्णी, रियाज कागदी, गणेश जाधव उपस्थित होते.

हातकणंगलेतील विजय पैशाचा

व्ही. बी. पाटील म्हणाले, शाहू छत्रपती यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकदिलामुळे झाला. आयत्या वेळेला महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. तरीही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले आणि अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला. परंतु हा विजय महायुतीचा नसून पैशाचा आहे. राजू शेट्टींनी ऐकलं असतं तर जिल्ह्यात ठरल्याप्रमाणे आघाडीच्या दोन्ही जागा आल्या असत्या.

Web Title: Sharad Pawar group wants another assembly constituency in Kolhapur says V. B. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.