शरद पवार पुन्हा एकदा संघर्षाच्या मार्गावर!, ८३ व्या वर्षी थाेपटले दंड
By वसंत भोसले | Published: July 3, 2023 11:58 AM2023-07-03T11:58:30+5:302023-07-03T12:00:26+5:30
प्रीती संगमावरून पक्ष बांधणीला पुन्हा सुरुवात
वसंत भाेसले
काेल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे केंद्रबिंदू असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार वयाच्या ८३ व्या वर्षी पुन्हा एकदा दंड थोपटून राजकारणाचा नवा डाव मांडण्याची हिम्मत बाळगत आहेत. त्यासाठी जनतेच्या न्यायालयात जाऊन निकाल घेण्याचा निर्धारही व्यक्त करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून अजित पवार काही आमदारांसह भाजप-शिवसेना युतीमध्ये सामील झाले. याची बातमी महाराष्ट्रात रविवारी दुपारनंतर कळू लागली. पुढे दीड-दाेन तासांत युतीच्या सरकारमध्ये सामील हाेण्यासाठी आठ सहकाऱ्यांसह त्यांनी शपथ पण घेऊन टाकली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या जाणकारांना कोड्यात टाकणाऱ्या घडामोडी घडत हाेत्या, तशा सर्वांच्या नजरा शरद पवार यांच्या भूमिकेकडे लागून राहिल्या हाेत्या.
शरद पवार राजकीय किंवा नैसर्गिक भूकंपांनी कधीच विचलित हाेत नाहीत, हे अनेकवेळा महाराष्ट्राने पाहिले आहे. किल्लारीच्या भूकंपानंतर पुढील दाेन तासांत ‘वर्षा’ निवासस्थानावरून किल्लारीच्या उद्ध्वस्त घरांची पाहणी करण्यात ते व्यस्त हाेते. निघण्यापूर्वी सर्व सचिवांनी एकत्र येऊन मंत्रालयात बैठक घेण्याची सूचना करायला ते विसरले नव्हते.
१९७८ च्या जुलै महिन्यातच शरद पवार यांनी वयाच्या केवळ २८ व्या वर्षी रेड्डी काँग्रेसमधून बंड केले हाेते. रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस आघाडीचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरकार हाेते. पुढे रेड्डी काँग्रेसचे रूप बदलून समाजवादी काँग्रेस झाली. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी काँग्रेसचे ५६ आमदार निवडून आले.
शरद पवार यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ५६ पैकी सहा जणांचा अपवाद वगळता सारे इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. त्यात इचलकरंजीचे आमदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा समावेश हाेता. वसंतदादा यांच्या मंत्रिमंडळात त्यांना नगरविकास व उद्याेग खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले हाेते.
शरद पवार १९८५ च्या विधानसभेत पुन्हा एकदा शेकाप आणि जनता पक्षाशी आघाडी करून समाजवादी काँग्रेसतर्फे लढले. असे संघर्ष करण्याचे अनेक प्रसंग आले. निवडणुकीत पवार यांचा झंझावाती प्रचार दिवसरात्र चालत असे. सांगली जिल्ह्यातील विट्यात पहाटे पाच वाजता त्यांची प्रचार सभा झाली हाेती.
शरद पवार यांचे १९९० ते २००० चे दशक काँग्रेसश्रेष्ठींशी संघर्ष करण्यात गेले. त्यांना काँग्रेसमध्ये देशपातळीवर नेतृत्व करण्याची संधीच मिळाली नाही. त्यावेळी महाराष्ट्राने त्यांची राजकीय कारणांनी प्रचंड बदनामी केली. असंख्य गंभीर आराेप केले. त्यातील एकही सिद्ध झाला नाही. सोनिया गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाने त्यांच्या देशपातळीवरील नेतृत्वाच्या आशा मावळल्या. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला.
गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या पी. व्ही. नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांनीही शरद पवार यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील काँग्रेसजनांनाच उभे केले. ज्या सुधाकरराव नाईक यांना सत्तेवर बसवून केंद्रात पवार गेले. त्यांनीच ‘शिकार टप्प्यात आल्याशिवाय ती मी करीत नसताे’ असे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उद्गार काढले ते बंडही शरद पवार यांनी मोडून काढले.
राष्ट्रवादीची १० जून १९९९ राेजी स्थापना करून गेली २४ वर्षे हा पक्ष संघर्ष करीत आहे. या पक्षाला कधी धक्का बसला नव्हता. मात्र, पक्षातच लहानाचे माेठे झालेल्या नेत्यांनी अनेक संशयास्पद व्यवहार केले. शरद पवार यांनी इतके राजकीय उन्हाळे-पावसाळे पाहिले मात्र अंगाला डाग लागू दिला नाही. तेवढे राजकीय व्यवहारचातुर्यही न शिकता ‘आम्ही साहेबांचे (पवार) अनुयायी’ म्हणून राजकीय खुर्च्या उबवत हाेते. अशा राजकीय नेतेच अजित पवार यांना नेता करून डाग पुसण्यासाठी धडपड करीत आहेत.
या सर्वांविरुद्ध पवार यांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुन्हा एकदा प्रीती संगमावर आज, साेमवारी येत आहेत. वयाच्या ८३ व्या वर्षीही लढण्याची उमेद बाळगून आणि तेही पवार कुटुंबीयांतील सदस्याविराेधात उभे ठाकण्याचा निर्धार केला आहे. पवार यांचा मार्गच समृद्धीचा कधी नव्हता, ताे संघर्षाचाच आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसते आहे.