'शरद पवार, संजय राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:20 PM2022-06-24T12:20:31+5:302022-06-24T12:21:54+5:30
शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो १३ जणांच्या कार्यकारिणीपुढे ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल.
कोल्हापूर : राज्यात शिवसेनेचे झालेले बंड आणि अन्य राजकीय घडामोडींशी भाजपचा काहीही संबंध नाही असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कानावर हात ठेवले. ते शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीनंतर आणि शिंदे यांच्या बंडानंतर पाटील प्रथमच कोल्हापुरात आले आहेत. यावेळी पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या कामासाठी देवेंद्र फडणवीस हे गेले तीन दिवस सातत्याने दिल्लीला जात आहेत. शिवसेनेतील बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे एकनाथ शिंदे यांनाच विचारावे लागेल. राज्यातील हालचाली मी सध्या केवळ टीव्हीवरच पहात आहे. शिंदे यांच्यासोबत कोण कोण आहे याची मला माहिती नाही. मोहित कंबोज हे सर्वपक्षीयांचे मित्र आहेत.
शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर...
शिंदे यांच्याकडून काही प्रस्ताव आला तर तो १३ जणांच्या कार्यकारिणीपुढे ठेवला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. अशा घडामोडी सुरू असत्या तर मला कोल्हापुरला जावू दिले असते का असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
पवार, राऊत यांना अधिकचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य
शरद पवार आणि संजय राऊत हे काहीही बोलतात. त्यांना जरा अधिकचे अभिस्वातंत्र्य आहे. राऊत सकाळी एक बोलतात आणि दुपारी दुसरेच असेही पाटील म्हणाले.