इनकमिंग वाढलं, पण 'फिल्टर' लावणार; शरद पवारांनी सांगितला इतर पक्षाच्या नेत्यांना घेण्यासाठीचा निकष!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:51 PM2024-09-04T13:51:35+5:302024-09-04T13:53:03+5:30
कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आणखी काही नेतेही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं.
Kolhapur Sharad Pawar ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात तिकीट मिळण्याची शक्यता धूसर असलेले नेते पवारांच्या आश्रयाला जात असल्याचं चित्र आहे. कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता आणखी काही नेतेही पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर तुम्ही पक्षात येणाऱ्यांसाठी काही निकष ठेवला आहे का, असा प्रश्न आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेच्या दरम्यान शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"एखाद्या व्यक्तीला पक्षात घेताना आम्ही विचार करतोय की, त्या व्यक्तीचं त्याच्या परिसरात काम कसं आहे, तसंच त्या भागातील आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिलेल्या लोकांचं काय मत आहे, सामाजिक-राजकीय जीवनात त्याचं चारित्र्य कसं आहे आणि त्या व्यक्तीची उपयुक्तता किती आहे, हे तपासून त्याचं स्वागत करायचं की नाही, हे आम्ही ठरवतो," अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.
दरम्यान, आणखी किती नेते टार्गेटवर आहेत, असा प्रश्नही यावेळी शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी लगेच आपले पत्ते खुले करण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत काय निर्णय झाला?
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रिपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोण मुख्यमंत्री होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाचं नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे", असं पवार यांनी स्पष्ट केलं.