शरद पवार २७ पासून कोल्हापूर दौऱ्यावर; विविध कार्यक्रम
By admin | Published: January 14, 2017 12:40 AM2017-01-14T00:40:25+5:302017-01-14T00:40:25+5:30
कार्यकर्त्यांत उत्साह : जयसिंगराव पवार यांचा अमृतमहोत्सव
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे शुक्रवार, दि. २७ जानेवारीपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या २८ ला होणाऱ्या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या मुख्य समारंभासाठी ते येथे येत
आहेत.
डॉ. पवार यांचे अमृतमहोत्सवी वर्ष ३० डिसेंबरला सुरू झाले आहे; परंतु मुख्य सत्कार सोहळा २८ जानेवारीस केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू असून, गौरवांकाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
शरद पवार हे शुक्रवारी (दि. २७ ) सांगलीत येणार आहेत. तिथे दुपारी एका कार्यक्रमास उपस्थित राहून ते सायंकाळी कोल्हापुरात येणार आहेत. त्याच दिवशी महाराणा प्रताप चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या डॉ. शेळके यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन, महापौर हसिना फरास यांचा सत्कार आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, असे नियोजन जिल्हा शाखेकडून सुरू आहे. ज्येष्ठ पत्रकार बाळ पोतदार यांनी लिहिलेल्या ‘गांधीजी होते म्हणून...’ या ग्रंथाचे प्रकाशनही पवार यांच्या हस्ते होणार आहे. दि. २७ ला सायंकाळी साडेपाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात हा समारंभ होत आहे. आम्ही भारतीय लोक आंदोलन संस्थेच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होईल.
दरम्यान, दोन्ही काँग्रेसमध्ये राज्य स्तरावरच आघाडीच्या अद्याप फारशा हालचाली नाहीत. गेल्या निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढल्या होत्या. आताही तशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्याआधीच हा दौरा होत असल्याने कार्यकर्त्यांनाही उत्साहित व्हायला मदत होऊ शकेल. (प्रतिनिधी)