शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही - : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:44 AM2019-10-12T00:44:55+5:302019-10-12T00:46:23+5:30
चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
कोल्हापूर : ‘शरद पवार, तुम्ही पाटलांना ओळखलं नाही. डोक्यात खूप काही चालू असतं. चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो, हे समजतही नाही,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
‘कोल्हापूर उत्तर’मधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ पेटाळा आणि शाहू स्मारक भवन येथे आयोजित मेळाव्यांमध्ये ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी पवारांवर सडकून टीका करीत बंडखोरांनाही इशारा दिला.
पाटील म्हणाले, पवार यांना वाटले की, मला कोथरूडमध्ये अडकवून ठेवता येईल; पण तसे होणार नाही. मी परवा येऊन प्रकाश आबिटकर यांचा अर्ज दाखल करून गेलो. आत्ता आलोय. अमित शहा यांच्याबरोबर रविवारी येणार आहे. नंतर सांगली, सातारा जिल्ह्यांतील सभा आहेत. त्यामुळे मी कोथरूडमध्ये अडकलो नाही. मी उच्चांकी मतांनी निवडून येणार आहे. मी निवडणूक युद्ध म्हणूनच लढतो. त्यामुळे कोथरूडमध्ये शेवटचे मत पडेपर्यंत मी थांबणार आहे.
पक्षाचे आणि युतीचे कार्य यांकडे मी धर्मकार्य म्हणून पाहतो. मला अहंकार नाही. मी संदीप देसार्इंच्या घरीही जाईन; परंतु त्यांनी जे चालले आहे ते थांबवावे. लोकसभेला माझ्याविरोधात कंड्या पिकविल्या गेल्या; परंतु प्रामणिकपणाने काम केले म्हणूनच संजय मंडलिक यांना मोठे मताधिक्य मिळाले. आताही राजेश क्षीरसागर यांना विजयी करून हॅट्ट्रिक करूया.
राजेश क्षीरसागर म्हणाले, प्रचंड विकासकामे केली, रस्त्यावरील चळवळी केल्या, सामाजिक कामे उभारली, विधानसभेत प्रश्न मांडले. ज्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूरच्या मानगुटीवर टोलचे भूत आणून बसवले होते, तो टोल रद्द करण्यासाठी आक्रमक आंदोलन केले. ३० वर्षे असलेल्या युतीची जाणीव ठेवत भाजपचे कार्यकर्ते माझ्यासाठी राबतील असा विश्वास आहे.
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे भाग्य आम्हांला चंद्रकांत पाटील यांच्यामुळे मिळाले. त्यांचा आदेश मानून आम्ही काम करणार आहोत. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांनी विरोधी उमेदवाराला संबोधलेले ‘घोसाळकर रिटर्न’ हे शब्द जनताच खरे करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, उदय पवार,नंदकुमार मोरे, बाबा पार्टे, नगरसेवक राहुल चव्हाण, आर. डी. पाटील, अशोक जाधव, रवी चौगुले, दीपक गौड, जयवंत हारुगले, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जखम बरी झाली नाही तर हात काढावा लागतो
पाटील म्हणाले, हाताला जखम झाली तर सुरुवातीला मलम, गोळ्या दिल्या जातात; परंतु अशी वेळ येते की हात काढावाच लागतो. त्यामुळे सुरुवातीला विरोधी काम करणाऱ्यांना समजून सांगू. तरीही आडमुठेपणा सुरूच ठेवला तर मात्र कारवाई अटळ आहे.
हिंदुत्ववादी मतदारसंघ कॉँग्रेसच्या ताब्यात देऊ नका
पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे. तो कॉँग्रेसच्या हातात देऊ नका. ज्यांनी कॉँग्रेसची सभासदत्वाची पावतीही फाडली नाही, घरात दोन भाजपचे नगरसेवक आहेत, अशांनी संधी मिळतेय म्हणून कॉँग्रेसची उमेदवारी घेतली. परंतु ज्या कॉँग्रेसला स्वत:चा जिल्हाध्यक्ष टिकवता आला नाही, त्या मरणप्राय झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राणवायू फुंकु नका.
संजय घाटगेंनी घेतली चंद्रकांत पाटील यांची भेट
मेळाव्यानंतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कागलचे शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी भेट घेतली. या मतदारसंघात तुम्ही एक-दोन सभा घ्याव्यात, अशी विनंती घाटगे यांनी पाटील यांना केली. त्यावर पालकमंत्र्यांनी सभेसाठी तारीख देतो, असे सांगितले. सध्या कागल तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय घाटगे असताना त्या ठिकाणी भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पाठबळ आपल्यासोबत आहे, याचा संदेश देण्यासाठी घाटगे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मंडलिकांनी सोयीचे राजकारण थांबवावे
आम्ही साधे-भोळे आहोत, असे कोणाला वाटत असेल, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, भलेभलेही आम्हाला घाबरतात. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी युतीधर्म पाळावा आणि कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक यांचा प्रचार करावा, अन्यथा आमचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. मंडलिकांनी सोयीचे राजकारण संपवावे. कारण शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यात आठ जागा जिंकायच्या आहेत, याची आठवणही पाटील यांनी करून दिली. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात असू द्या, असा दमच त्यांनी दिला.