शरद पवार यांच्या जोडण्या..!
By admin | Published: September 16, 2014 12:23 AM2014-09-16T00:23:16+5:302014-09-16T00:37:12+5:30
कागल-चंदगडचे राजकारण : स्वत:हून गेले विक्रमसिंह घाटगेंंच्या घरी
कोल्हापूर : कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांची लढत येत्या विधानसभा निवडणुकीत सोपी व्हावी यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात आल्यावर त्यांच्या सवयीप्रमाणे काही जोडण्या लावल्या.
जे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत, नाराज आहेत, त्यांना बरोबर घेऊन त्यांची समजूत काढणे. ज्यांना आपण पूर्वी मदत केली आहे, त्यांच्याकडून पुन्हा सहकार्याची अपेक्षा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जे पक्षविरोधी कारवाया करीत असतात, त्यांना तराटणी देण्याचे काम त्यांच्याकडून होते. तशी तराटणी त्यांनी आज, सोमवारी कुणाला दिली नसली तरी बेरजेचे राजकारण करण्यासाठी मात्र ते स्वत:हून शाहू साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांच्या नागाळा पार्कातील कागल हाऊस या निवासस्थानी गेले व तिथे सुमारे अर्धा तास त्यांनी चर्चा केली. त्या चर्चेतील मुद्दे काही असले तरी कागल मतदारसंघात घाटगे गटाने जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा द्यावा हाच त्यांच्या भेटीचा मुख्य हेतू होता. चंदगड मतदारसंघातील उमेदवारीचा गुंताही सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.
कागलमध्ये महायुतीचे उमेदवार संजय घाटगे विरुद्ध मुश्रीफ यांच्यात लढत होत आहे. संजय घाटगे व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गट एकत्र आल्याने लढत अटीतटीची बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर विक्रमसिंह घाटगे गटाच्या पाठिंब्यास महत्त्व आले आहे. लोकसभेला राजे घाटगे गट व मुश्रीफ यांनी एकत्र येऊन ताकद लावल्याने मंडलिक यांचे मताधिक्य कमी झाले. तसेच पाठबळ मुश्रीफ यांना राजे गटाकडून मिळावे, अशी मुश्रीफ यांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याबद्दल थेट पवार यांनीच विक्रमसिंह घाटगे यांची भेट घेण्यासाठी मुश्रीफ यांनी प्रयत्न केले.
सायंकाळी पत्रकार परिषद झाल्यावर पवार मुश्रीफ यांच्यासह घाटगे यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीत या तिघा नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. पुन्हा पवार यांना निरोप देण्यासाठी घाटगे दारापर्यंत आले होते. पवार निघून गेल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. ही भेट नैमित्तिक असून, चर्चेतून मदतीचे फक्त संकेत पवारांनी दिले.
उमेदवारांची अजून अधिकृत घोषणा झाली नसताना पाठिंब्याचीच घाई कशाला, अशी विचारणा पत्रकारांशी बोलताना घाटगे यांनी केली. बंद खोलीतील चर्चेत मुश्रीफ यांनीच ‘साहेब, राजेंना पाठिंब्याच्या निर्णय घ्यायला सांगा’, अशी विनंती पवार यांना केली. त्यावर पवार यांनी हसत-हसत तसे अप्रत्यक्षपणे सुचविले.
चंदगडबाबत आज पुन्हा बैठक
चंदगड मतदारसंघातील उमेदवारीबाबत आज पंचशील हॉटेलवर आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर व रामराजे कुपेकर यांच्याशी पवार यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर इच्छुक उमेदवार संग्राम कुपेकर यांनाही चर्चेसाठी बोलविले होते; परंतु आज ते वेळेत येऊ न शकल्याने उद्या, मंगळवारी त्यांच्याशी ही चर्चा होणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. हा मतदारसंघ दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांनी आजपर्यंत विकासकामे व संपर्काच्या बळावर आपल्याकडे ठेवला. त्यांना मानणारा मोठा मतदार आजही आहे. अशा स्थितीत श्रीमती संध्यादेवी की संग्राम असा वाद झाल्यावर त्यातून ही जागा धोक्यात येऊ शकते हे पवार यांच्याही ध्यानात आले आहे. त्यामुळे कुपेकर कुटुंबातच समझोता घडवून आणण्यासाठी पवार यांनी संग्रामसह भैयासाहेब कुपेकर व बाळ कुपकेर यांना चर्चेसाठी बोलविले आहे. संग्राम अजून तरुण आहेत, त्यांना पक्षातच महत्त्वाची जबाबदारी देऊन त्यांची समजूत काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
समजून घ्या
निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पवारांनी कशासाठी भेट घेतली हे समजून घ्या. कागलसह घाटगे गटाची ज्या मतदारसंघात ताकद आहे, तिथे कोणास मदत करावयाची याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे विक्रमसिंह घाटगे यांनी सांगितले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गेली दोन महिने करवीरमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. तिन्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ठाम राहिलो आहे, विधानसभेला राष्ट्रवादीकडून सहकार्य मिळावे, अशी विनंतीही पाटील यांनी पवार यांना केली. या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारभाराचा पाढाच वाचला. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमवेत असलेली राष्ट्रवादी नेत्यांची छायाचित्रे व त्यांच्या वक्तव्याची वृतपत्रांतील कात्रणेही पाटील यांनी पवार यांना दिल्याचे समजते.