मामाची पोरगी करायची राहूनच गेली.., शरद पवार यांची मिश्कील खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 11:16 AM2018-02-11T11:16:59+5:302018-02-11T11:17:18+5:30
मामाची किंवा मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली.
कोल्हापूर : मामाची किंवा मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सकाळी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली. गोलिवडे हे त्यांच्या मामाचे गाव. व्यस्त कार्यक्रमातूनही पवार यांनी या गावास आवर्जून भेट देऊन मनाच्या कप्प्यातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गावानेही गुढ्या उभारून व दारात रांगोळी, फुलांचा सडा घालून पवार यांचे जंगी स्वागत केले.
मामाचे गाव म्हटले की, त्या जुन्या आठवणींची प्रत्येकाच्याच मनाला उत्सुकता लागणे हे साहजिकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हेही कसे काय याला अपवाद ठरतील..? त्यामुळे पवार यांनी गोलिवडे गावाला आपुलकीची भेट दिली. त्यांच्या भेटीने गावामध्ये चैतन्य संचारले. त्यांच्या स्वागतासाठी सारा गाव एकवटला. पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचा जन्म १९१४ ला या गावातील भोसले कुटुंबामध्ये झाला. भोसले कुटुंबीय काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले; परंतु ही आठवण पवार यांना पक्की असल्यामुळे पवार यांनी एका सभेत या गावाला एकवेळ भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. हा निरोप गावक-यांना मिळताच त्यांना सुखद धक्काच बसला. त्यानुसार ही भेट झाली.
कोतोली फाटा ते गोलिवडे गावापर्यंत जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या. गावच्या रस्त्यावरील साफसफाई व डागडुजी करण्यासाठी ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी परिश्रम केले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीचा सडा घालण्यात आल. गाववेशीवर फुलांची स्वागत कमान उभारण्यात आली. कार्यक्रमासाठी गावाच्या मुख्य चौकात भव्य मंडप उभारण्यात आला होता. पवार यांच्या आगमनाच्या आनंदाप्रीत्यर्थ गुढ्या उभारण्यात आल्या. गावांतील माता-भगिनींनी हिरव्या साड्या परिधान करून औक्षण केले. पुरूष मंडळी कोल्हापूरी फेटे बांधून सज्ज होती. गावातील योगी प्रभुनाथ फौंडेशनच्या युवकांचे झांजपथकाच्या गजरात पवार यांची मिरवणूक काढण्यात आली. पवार यांना ग्रामदैवत भैरवनाथांची प्रतिकृती असणारी दीड किलोची चांदीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
----------------
असा आहे गाव....
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची २० वर्षांची परंपरा
योगी प्रभुनाथ यांच्या आध्यात्मिक विचारांचा पगडा त्यामुळे मांसाहाराला फाटा.
‘एक गाव, एक गणपती’ची पंचवीस वर्षांची परंपरा
‘आदर्श गाव’ पुरस्काराने सन्मान.
सरस्वती महिला बचत गट जिल्ह्यात सन्मानित.
गावामध्ये लोकवर्गणीतून लहान-मोठी दहा मंदिरे; त्यामुळे गावाला अध्यात्माचा वारसा कायम.