नवा भूमिअधिग्रहण कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका दुटप्पीपणाची, राजू शेट्टींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:08 PM2022-02-08T14:08:42+5:302022-02-08T14:10:10+5:30

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही

Sharad Pawar's role in the new land acquisition law is duplicitous, Criticism of Raju Shetty | नवा भूमिअधिग्रहण कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका दुटप्पीपणाची, राजू शेट्टींचे टीकास्त्र

नवा भूमिअधिग्रहण कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका दुटप्पीपणाची, राजू शेट्टींचे टीकास्त्र

Next

कागल : नवा भूमिअधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे. एनडीएबरोबर असतानाही आपण लोकसभेत या कायद्याला कडाडून विरोध केला होता. तेव्हा शिवसेना व काँग्रेस, राष्ट्रवादीने आपणाला पाठिंबा दिला होता. आता हीच मंडळी या कायद्याचे समर्थन का करीत आहेत? जेष्ठ नेते शरद पवारांची भूमिकाही या कायद्याबद्दल दुटप्पीपणाची आहे. लवकरच त्यांना याबद्दल पत्र लिहिणार आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

जिल्ह्यातील तिन्ही मंत्री बिनकामाचे असून शेतकरी, सर्वसामान्य लोकांशी त्यांना काही देणे-घेणे उरलेले नाही, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.

संघटनेच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, अविनाश मगदुम, शिवाजी कळमकर, संतोष बाबर, तानाजी मगदुम, प्रभू भोजे, राजू बागल, नितेश कोगनोळे आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले आहे. पशुखाद्य महागले आहे; पण उसाला व दुधाला भाव तोच आहे. मात्र वीज वितरण कंपनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडत आहे. यावर तिन्ही मंत्री बोलत नाहीत. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देतो म्हणत दोन अर्थसंकल्प गेले. आता या तिसऱ्या अर्थसंकल्पात तरी ही तरतूद करावी.

प्रतिटन दोनशे रुपये जादा दर द्यावा

राजू शेट्टी म्हणाले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखर, इथेनाॅललाही चांगला दर येत आहे. निश्चित एफआरपी देऊनही साखर कारखान्यांच्याकडे चांगले पैसे शिल्लक राहणार आहेत. म्हणून एफआरपीपेक्षा प्रतिटन दोनशे रुपये जादा दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठीही आंदोलन छेडणार आहोत.

..म्हणून रस्त्यावर उतरावे लागत आहे

महाविकास आघाडीमध्ये आपण असताना विरोधी पक्षासारखे मोर्चे का काढीत आहात. या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, घटक पक्षांसोबत एकही बैठक झालेली नाही म्हणून मोर्चे काढून शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्येतीच्या कारणास्तव बैठक होऊ शकलेली नाही म्हणून पत्र लिहित आहे.

Web Title: Sharad Pawar's role in the new land acquisition law is duplicitous, Criticism of Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.