शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:35 AM2024-09-03T11:35:09+5:302024-09-03T11:36:28+5:30

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून रणनीती आखली जात आहे.

Sharad Pawars visit to Kolhapur a triple shock to the Grand Alliance | शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण

शरद पवारांचा कोल्हापूर दौरा, महायुतीला तिहेरी हादरा?; नेत्यांच्या भेटीगाठींनी चर्चांना उधाण

Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी पवार यांच्याकडून रणनीती आखली जात आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांचा आज पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. अशातच महायुतीतील आणखी दोन नेत्यांनीही शरद पवार यांची ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये जात भेट घेतल्याने कोल्हापुरात महायुतीला तिहेरी धक्का बसणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. राधानगरी-भुदरगड या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनी आज सकाळी पवार यांची भेट घेतली आहे.

जागावाटपाच्या तिढ्यामुळे तिकीट मिळण्याची शक्यता कमी असलेले नेते सध्या अन्य राजकीय पर्यायांच्या शोधात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून नेत्यांच्या पक्षांतरांना वेग आला आहे. अशातच  के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतल्याने आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नेमके काय फेरबदल होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

कोल्हापुरात पवारांची मोर्चेबांधणी

शरद पवार हे सोमवारी दुपारी कोल्हापुरात आले. यावेळी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. अर्धा तास ते हॉटेलमध्ये थांबल्यानंतर बेळगावकडे रवाना झाले. पुढील चार दिवस शरद पवार हे कोल्हापुरात थांबणार आहेत. गुरुवारी सकाळी ते कडेगाव (सांगली) च्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातून जाणार आहे. या दरम्यान त्यांचे कोल्हापुरात भरगच्च कार्यक्रम आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या दौऱ्याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. पुढील दोन तीन दिवसात अनेक घडामोडी घडण्याचा अंदाज आहे.

कागलमध्ये डाव टाकणार! 

शरद पवार हे आज मंगळवारी पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच कागल दौऱ्यावर येत आहेत. पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता कागलच्या गैबी चौकात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ हे पवार यांचे एकनिष्ठ शिलेदार मानले जात होते. मात्र, पक्षाची शकले उडाल्यानंतर मुश्रीफ यांनी अजित पवार यांची संगत करत भाजपबरोबर घरोबा केला. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ यांना घेरण्यासाठी पवार यांनी त्यांचेच पारंपरिक प्रतिस्पर्धी समरजित यांना पक्षात घेऊन आव्हान उभे केले आहे. साथ सोडलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन पवार यांनी त्यांच्या स्टाइलने त्या त्या नेत्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.

मुश्रीफ यांच्याविना पहिलाच दौरा 
शरद पवार हे कागलमध्ये आले अन् त्यांच्यासोबत त्यांच्या हसन मुश्रीफ नाहीत हे गेल्या साडेतीन दशकात एकदाही घडलेले नाही. मात्र, आजचा पवार यांचा कागल दौरा हा पहिल्यांदाच मुश्रीफ यांच्याविना असेल. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्यासोबत नसल्याची खंत मुश्रीफ यांनी व्यक्त केली होती.

Web Title: Sharad Pawars visit to Kolhapur a triple shock to the Grand Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.