तुडुंब गर्दीत शरद पवार यांचे कोल्हापुरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:23 AM2021-01-22T04:23:52+5:302021-01-22T04:23:52+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तुडुंब गर्दीत गुरुवारी रात्री आठ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. ...
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे तुडुंब गर्दीत गुरुवारी रात्री आठ वाजता येथील शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. पवार हे पत्नी प्रतिभा यांच्यासह गोव्यातून कोल्हापुरात आले, तर खासदार सुप्रिया सुळे आणि सतेज पाटील हे दोघेही बेळगावहून या ठिकाणी दाखल झाले. पवार जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, पवार यांच्यासोबत आंबोलीहून आलेले आमदार राजेश पाटील, व्ही. बी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, ए. वाय पाटील, आर. के. पोवार, नाविद मुश्रीफ, राजू लाटकर, आदिल फरास, रमेश पोवार, अनिल यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पवार यांना भेटण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. महानगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आपले पंधरा-वीस कार्यकर्ते सोबत आणल्याने अखेर पोलिसांना या ठिकाणी शिस्त लावावी लागली. महिलाही मोठ्या संख्येने पवार यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. पूर्वीच्या नियोजनानुसार पवार हे सांगली जिल्ह्यातील कार्यक्रम आवरून पुन्हा कोल्हापुरात येणार होते. मात्र, सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याची दुर्घटना घडल्याने ते सांगलीहूनच पुण्याला जाणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
चौकट
मुश्रीफ, सुप्रिया सुळे आणि सतेज यांच्यात हास्यविनोद
शरद पवार विश्रामगृहावरून निघतानाच पालकमंत्री सतेज पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. हे दोघेही मुंबईहून विमानाने बेळगावला आणि तेथून कोल्हापुरात आले. पवार येथून गेल्यानंतर हसन मुश्रीफ, सुप्रिया सुळे आणि सतेज पाटील यांच्यात हास्यविनोदासह चर्चा रंगली. यानंतर सुळे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.
चौकट
जयवंत शिंपी यांना अध्यक्ष करा
दरम्यान, गोव्याहून येताना पवार हे आंबोलीतील वसंतरावदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या केंद्रावर थांबले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयवंत शिंपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली. जिल्हा परिषदेच्या नजीकच्या पदाधिकारी बदलामध्ये शिंपी यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी मागणी यावेळी शिंपी समर्थकांनी केली. यावेळी प्रवीणभाई केसरकर उपस्थित होते.
चौकट
आजरा कारखान्याबाबत आज बैठक
आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर चेअरमन सुनील शिंत्रे आणि संचालकांनी पवार यांचे स्वागत केले आणि निवेदन दिले. त्यावेळी आमदार राजेश पाटील आणि जयवंत शिंपी यांनी आपल्याला कारखान्याचा विषय सांगितला आहे. तुम्ही शनिवारी सकाळी ८ वाजता कोल्हापुरात या, याबाबत चर्चा करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
२१०१२०२१ कोल शरद पवार १
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गुरुवारी कोल्हापुरात आगमन झाले. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार राजेश पाटील, आमदार पी. एन. पाटील, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर उपस्थित होते.
२१०१२०२० कोल शरद पवार ०२
शरद पवार यांना भेटण्यासाठी अशी तुडुंब गर्दी झाली होती.
२१०१२०२१ कोल शरद पवार ०३
शासकीय विश्रामगृहावर मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या हास्यविनोदात रंगल्या होत्या.
छाया : नसीर अत्तार