शारंगधर देशमुख कोल्हापूर महापालिकेचे ‘स्थायी’चे सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 04:03 PM2019-01-29T16:03:19+5:302019-01-29T16:07:40+5:30
गतवर्षी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेल्या धक्कादायक पराभवाचा बदला अखेर मंगळवारी कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शारंगधर वसंतराव देशमुख यांनी घेतला. देशमुख यांनी ताराराणी आघाडीच्या राजाराम गायकवाड यांचा ९ विरुध्द ७ मतांनी पराभव केला.
कोल्हापूर : गतवर्षी झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेल्या धक्कादायक पराभवाचा बदला अखेर मंगळवारी कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शारंगधर वसंतराव देशमुख यांनी घेतला. गेले वर्षभर पराभवाची सल मनात ठेऊन वावरणाऱ्या देशमुख यांनी स्वत:च सभापतीपदाच्या निवडणुकीत उतरुन भाजप -ताराराणी आघाडीला आव्हान दिले होते. अत्यंत सावध पवित्रा घेत मजबुत व्युहरचना आखत देशमुख यांनी ताराराणी आघाडीच्या राजाराम गायकवाड यांचा ९ विरुध्द ७ मतांनी पराभव केला.
महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडून शारंगधर देशमुख यांनी तर भाजप ताराराणी आघाडीकडून राजाराम गायकवाड यांनी निवडणुक लढविली.
सभापतीपदासाठी काँग्रेसचे गटनेते देशमुख व राजाराम गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी सभाध्यक्षांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही. यानंतर हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यावेळी देशमुख यांना ९ मते तर गायकवाड यांना ७ मते पडली.
अनुराधा खेडकर यांना मिळाली संधी
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या अनुराधा सचिन खेडकर व भाजपच्या ललीता उर्फ अश्विनी अरुण बारामते यांचे अर्ज दाखल झाले होते. अर्जांची छाननी झाल्यानंतर मतदान घेण्यात आले.त्यावेळी खेडकर यांना ५ मते तर भाजपच्या बारामते यांना ४ मते पडली.
खेडकर यांना सर्वाधिक मते पडल्याने त्यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. खेडकर या प्रभाग क्रमांक ५१ - लक्षतीर्थ वसाहत येथून दुसऱ्यांना निवडून आल्या आहेत. उपसभापतीपदासाठी अशाच पध्दतीने मतदान झाले. कॉँग्रेच्या छाया पोवार या विजयी झाल्या. त्यांनी ताराराणी आघाडीच्या मेहजबीन सुभेदार यांचा पराभव केला.
रिना कांबळे प्रभाग समिती सभापती
गांधी मैदान प्रभाग सभापतीपदासाठी कॉँगेसच्या रिना कांबळे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या संतोष गायकवाड यांचा पराभव केला. या निवडणुकीत कांबळे यांना १३ तर गायकवाड यांना अवघी ५ मते मिळाली. भाजप - ताराराणी आघाडीला पाठींबा दिलेल्या तेजस्विनी इंगवले व राजू दिंडोर्ले हे गैरहजर होते. तीनही सभापती निवडणुकीत कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांचा मत मोजणी अधिकारी म्हणून काम पाहिले.
भव्य मिरवणुक व प्रचंड जल्लोष
शारंगधर देशमुख यांची सभापतीपदी निवड होताच त्यांच्याकार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर प्रचंड जल्लोष सुरु केला. वाद्यांच्या गजरात, फटक्यांची उधळण आणि गुलालाची उधळण करीत नेत्यांच्या नावांचा जयघोष करण्यात येत होता. देशमुख समर्थकांनी महापालिका ते क्रेशर चौक मार्गावर मिरवणुक काढली.
देशमुख दुसऱ्यांदा स्थायी सभापती
२००५ पासून सलग तीनवेळा शारंगधर देशमुख महापालिकेवर निवडून येत आहेत. २००७-०८ या त्यांनी सालात सभापतीपदाची निवडणुक लढविली. परंतु त्यावेळी सुनील मोदी यांनी अत्यंत चाणाक्षपणे आघाडी फोडून देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१२-१३ सालात देशमुख यांनी दुसऱ्यांदा निवडणुक लढवून सभापती होण्याचा मान मिळविला. आता ते दुसऱ्यांदा सभापती झाले.