मराठीतून शिक्षण, ऑस्ट्रेलियाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्ती; शर्मिलीने बनवला गूळ उत्पादनात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:14 PM2022-10-07T12:14:08+5:302022-10-07T13:09:37+5:30

भविष्यात पाण्याची टंचाई एवढी भासेल की ऊस लावता येणार नाही म्हणून ज्वारी, बीट, कलिंगडपासून गूळ उत्पादन करणार आहेत.

Sharmili Pratap Mane made Maharashtra brand in jaggery production | मराठीतून शिक्षण, ऑस्ट्रेलियाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्ती; शर्मिलीने बनवला गूळ उत्पादनात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड

मराठीतून शिक्षण, ऑस्ट्रेलियाकडून संशोधनासाठी शिष्यवृत्ती; शर्मिलीने बनवला गूळ उत्पादनात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड

Next

विश्वास पाटील

कोल्हापूर : कागलच्या सरलादेवी माने हायस्कूलमधून मराठीतून दहावी शिकलेल्या मुलीस चक्क ऑस्ट्रेलिया देशाने संशोधनाबद्दलची शिष्यवृत्ती द्यावी.. त्यांनी तिथे सात वर्षे जाऊन संशोधन करावे.. त्या देशाने त्यांना नागरिकत्व देतो; परंतु तुम्ही आमच्याच देशात राहून यापुढील संशोधन करा, असा आग्रह धरावा; परंतु मी जिथे शिकले, वाढले, त्याच मातीसाठी काहीतरी करणार ही भावना घेऊन परत यावे आणि आता गूळ उत्पादनातील महाराष्ट्राचा ब्रॅण्ड बनावा एवढे उत्तुंग कर्तृत्व गाजवले आहे त्या शर्मिली प्रताप माने यांनी आज त्या प्युअरमी या नावाने शंभर टक्के सेंद्रिय गुळाचे उत्पादन करतात.

कागल, वंदूर, पिंपळगाव, तिरपण या गावांतील ३० शेतकऱ्यांकडून स्वत:ची उत्पादनपद्धती देऊन त्यांच्याकडून गूळ तयार करून घेतात. दरमहा किमान एक टनाहून जास्त गूळ त्या सध्या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट, दोराबजी अशा स्टोअर्समधून विकत आहेत. सध्या त्यांचा गूळ देशातील सर्व मोठ्या शहरांत उपलब्ध आहे. गुळापासूनचे आठ पदार्थ त्या तयार करतात. त्यासाठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत त्यांचे उत्पादन युनिट आहे. गंमत वाटेल; परंतु त्यांच्या गुळाची ढेप ७ आणि १५ ग्रॅमची आहे. पावडरचा पाऊच ५ ग्रॅमपासून एक किलोपर्यंतचा आहे. काकवी एक चमच्यापासून अर्धा लिटरपर्यंत आहे. त्यास प्रचंड मागणी आहे.

कोल्हापुरात शाहू महाराजांच्या आधीपासून गूळ उद्योग हा कोल्हापूरची जगभरातील ओळख आहे. या उद्योगाचे दुखणे हे की त्याच्या कोणत्याही प्रक्रियेची शास्त्रशुद्ध उत्पादनपद्धती निश्चित झालेली नाही. ती करण्याचे आणि त्यातून गूळ उद्योगाचा चेहरामोहरा बदलण्याचेच काम शर्मिली यांनी हाती घेतले आहे. त्यात त्यांना चांगले यश येत आहे. या शर्मिली जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांच्या कन्या. मुले वडिलांहून जास्त कर्तृत्ववान निघाली की त्यासारखी दुसरी श्रीमंती नाही. ही श्रीमंती भय्या व त्यांच्या पत्नी सविता यांच्या वाट्याला आली आहे.

शर्मिली यांनी ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन विद्यापीठातून शंभर टक्के शिष्यवृत्तीतून पीएच.डी. केली. बायोप्रोसेसमध्ये त्यांनी एम.टेक केले. प्युअरमी ऑर्गनिक्स या कंपनीच्या त्या सीईओ आहेत. त्यांचे वय ३२ असून कागलमध्येच उद्येाग उभा करायचा म्हणून त्यांनी ठरवून लग्नही कोल्हापुरातीलच तरुणासोबत केले.
बाजरीमधून प्रथिने बाजूला करून त्याचा औषध निर्मितीसाठी कसा वापर करायचा आणि ऑस्ट्रेलियातील तुरडाळीसारख्याच लुपिन या पदार्थापासून मधुमेह कमी करणारी प्रथिने वेगळी काढण्याची प्रक्रिया ही त्यांच्या नावावर पेटंट नोंद आहेत.

उसापासून गूळ करतात; परंतु दिवाळीपासून त्या नारळ व पाम ट्रीपासून गूळ उत्पादन करणार आहेत. भविष्यात पाण्याची टंचाई एवढी भासेल की ऊस लावता येणार नाही म्हणून ज्वारी, बीट, कलिंगडपासून गूळ उत्पादन करणार आहेत. गूळ उत्पादनाच्या सर्व प्रक्रियेचे प्रमाणीकरण करून गुळाचा ब्रॅण्ड विकसित करण्याची त्यांची धडपड आहे. त्यात त्या नक्की यशस्वी होतील एवढी त्यांच्यात नक्कीच गुणवत्ता आहे. डोक्याला त्रास लई म्हणून अनेक गुऱ्हाळे बंद झाली. हा त्रास शोधून त्यावर उत्तर शोधण्याचा त्यांचा स्वत:शीच लढा सुरू आहे.

आई-वडिलांकडून नेतृत्व गुण, व्यवसायाची दृष्टी मिळाली. पती पीयूष देसाई यांनी वैचारिक स्वातंत्र्य दिले म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड करत आहे. त्यात माझ्यासोबत सामान्य शेतकरी आहेत. - शर्मिली प्रताप माने सीईओ, प्युअर मी ऑर्गनिक्स, कागल,

Web Title: Sharmili Pratap Mane made Maharashtra brand in jaggery production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.