मेडिकलमध्ये लपवून ठेवली होती धारदार शस्त्रे! तोरस्कर चौकातून दोघांना घेतले ताब्यात
By उद्धव गोडसे | Published: February 11, 2024 04:59 PM2024-02-11T16:59:46+5:302024-02-11T17:00:03+5:30
तोरस्कर चौक येथील नारायणी मेडिकलमध्ये लपवून ठेवलेली तलवार, एडका आणि कोयता, अशी तीन धारदार शस्त्रे लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केली.
कोल्हापूर : तोरस्कर चौक येथील नारायणी मेडिकलमध्ये लपवून ठेवलेली तलवार, एडका आणि कोयता, अशी तीन धारदार शस्त्रे लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र लपवणारे विपुल विश्वास आंबी (रा. तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) आणि संदेश प्रकाश भोसले (रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांच्या हालचालींवर पोलिसांची नजर आहे. यादरम्यान तोरस्कर चौकातील नारायणी मेडिकलमध्ये काही शस्त्रे लपविल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मेडिकलची झडती घेतली असता, तलवार, एडका आणि कोयता, अशी तीन धारदार शस्त्रे पोलिसांना मिळाली. तिन्ही शस्त्रे जप्त करून पोलिसांनी मेडिकल चालक विपुल आंबी आणि त्याचा मित्र संदेश भोसले या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शहरात वाढत असलेला धार्मिक द्वेष आणि संघर्ष यामुळे स्वसंरक्षणासाठी शस्त्रे मेडिकलमध्ये ठेवल्याची कबुली दोन्ही संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.