खासबागेतील ‘शर्वरी‘ ठरतेय इतरांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:43+5:302021-03-08T04:23:43+5:30
कोल्हापूर : कुस्तीचे धडे गिरवताना झालेल्या दुखापतीमुळे खेळातून माघार घेतलेल्या शर्वरीला घरात बसून इतरांप्रमाणे केवळ शिक्षण घेणे पसंत नव्हते. ...
कोल्हापूर : कुस्तीचे धडे गिरवताना झालेल्या दुखापतीमुळे खेळातून माघार घेतलेल्या शर्वरीला घरात बसून इतरांप्रमाणे केवळ शिक्षण घेणे पसंत नव्हते. त्यामुळे तिने वयाच्या सतराव्या वर्षी जरा हटके, पण पुरूषांची मक्तेदारी असलेल्या आईस्क्रिम व्यवसायात उडी मारली. तुम्ही म्हणाल हे काय सोपे काम आहे. मात्र, शर्वरीने ग्राहकांना ताजे आरोग्यदायी लाईव्ह आईस्क्रिम देण्याचा कोल्हापूरच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात नवा फंडा सुरू केला. त्या शर्वरी माणगावेविषयी थोडंसं....
शर्वरी ही १९५२ साली हेलंसिकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविलेल्या ऑलंपियन कृष्णराव माणगावे यांची नात आहे. कुस्ती माणगावे कुटुंबाच्या रक्तात पिढीजातच भिनलेली. त्यामुळे छोट्या शर्वरीला वयाच्या दहाव्यावर्षी वडील माणिकराव यांनी न्यू मोतिबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी घातले. त्यामुळे तिने प्रायव्हेट हायस्कूलमधून शिक्षण घेतानाच राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विजेतेपदही पटकाविले. कुस्तीचा सराव नित्यनियमाने सुरू होता. मात्र बारावीच्या दरम्यान सराव करताना तिला दुखापत झाली. या दुखापतीमुळे कुस्ती सोडावी लागली. ही बाब शर्वरीच्या मनाला पटणारी नव्हती. बसून केवळ शिक्षण घ्यायचे तिच्या मनाला काही पटणारे नव्हते. त्यात बहीण कल्याणी हिने तिच्या दुबईतील मित्राकडून वेगळ्या पद्धतीच्या रोलिंग आईस्क्रिमविषयी माहिती घेतली. ती माहिती शर्वरीला आवडली. तिने ती आत्मसात करून रोलिंग आईस्क्रिमची नवी संकल्पना कोल्हापूरकर खवय्यांपुढे आणली. यात ग्राहकाला अगदी समोरासमोर दूध, फळे टाकून अवघ्या काही मिनिटात हव्या त्या स्वादानुसार रोलिंग (लाईव्ह) आईस्क्रिम तयार करून दिले. हे आईस्क्रिमही स्वच्छ व आरोग्यदायी असल्यामुळे खवय्यांनी त्यास प्रतिसाद दिला. खास आईस्क्रिम पार्लरसाठी तिने टेम्पो तयार केला आहे. हा टेम्पो चालविण्याचा परवानाही तिने काढला आहे. मंगळवार पेठेतील घरापासून हा टेम्पो खासबाग येथील खाऊगल्लीत स्वत: चालवित ती नेते. तेथे ग्राहकाला हव्या त्या स्वादानुसार आईस्क्रिम बनवून देते. रात्री दहापर्यंत ती हा व्यवसाय करते. विशेष म्हणजे पुरुषांची मक्तेदारी मोडायचा तिचा मानस आहे. मग तो कोणताही व्यवसाय असो, त्यात महिला पुढेच असल्या पाहिजेत, असा तिचा आग्रह आहे.
फोटो : ०७०३२०२१-कोल-शर्वरी माणगावे