शहीद नितीन कोळी यांच्यावर आज दुधगावात अंत्यसंस्कार

By Admin | Published: October 31, 2016 12:12 AM2016-10-31T00:12:25+5:302016-10-31T00:12:25+5:30

अंत्ययात्रा निघणार : कर्मवीर चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवणार

Shastri Nitin Koli was cremated at Dudhgad today | शहीद नितीन कोळी यांच्यावर आज दुधगावात अंत्यसंस्कार

शहीद नितीन कोळी यांच्यावर आज दुधगावात अंत्यसंस्कार

googlenewsNext

 सांगली/दुधगाव : जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील माछील सेक्टर येथे शहीद झालेले दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी
सकाळी अकरा वाजता दुधगाव येथे वारणा नदीकाठी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
यावेळी ग्रामस्थांतर्फे अंत्ययात्रा काढली जाणार आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर दोन्ही बाजूस मानवी साखळी केली जाणार आहे.
सीमेवर गस्त घालत असताना पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नितीन कोळी हे शुक्रवारी रात्री शहीद झाले. त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त समजताच दुधगावमध्ये शोककळा पसरली. ग्रामस्थांनी शोकसभा घेऊन, दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन, आज सोमवारपर्यंत दुखवटा पाळला आहे. रविवारी कवठेपिरान, सावळवाडी व माळवाडी या तीन गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला.
रविवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीस तहसीलदार शरद पाटील, सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, मंडल अधिकारी राजू रजपूत, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय पाटील, बाबासाहेब तांदळे, आदी उपस्थित होते. बैठकीत अंत्यसंस्काराच्या तयारीबाबत चर्चा झाली. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था सांगली रोड, दत्त मंदिर, आष्टा-बागणी रोड व वारणा नदीकाठी करण्यात आली आहे.
रविवारी मध्यरात्री दोन वाजता नितीन कोळी यांचे पार्थिव इस्लामपुरात आल्यानंतर आज सकाळी सहा वाजता तेथून सीमा सुरक्षा दलाचे पथक पार्थिव घेऊन निघणार आहेत. त्यांच्यासोबत सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले, सहायक सैनिक कल्याण अधिकारी रणजितसिंह सूर्यवंशी आहेत. सकाळी सात वाजता पार्थिव नितीन कोळी यांच्या घरी नेण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तिथून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढली जाणार आहे. कर्मवीर चौक, चावडी कार्यालय, काझी गल्ली, अरिहंत कॉलनी या मार्गावरून अंत्ययात्रा दुधेश्वर मंदिरमार्गे वारणा नदीकाठी पोहोचणार आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस गावातील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मानवी साखळी करून थांबणार आहेत. सकाळी अकरा वाजता लष्करी इतमातात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
शहीद कोळी यांना पुण्यात मानवंदना
पुणे : शहीद झालेल्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव सांगलीकडे रवाना करण्यात आले.
मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली
शहीद नितीन कोळी यांना देवराज (वय ४ वर्षे) व युवराज (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. युवराजच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी वीर सेवा दल मध्यवर्ती समिती संचलित लिटल स्टार इंग्लिश मेडियम स्कूलने घेतली आहे. सध्या देवराज हा याच स्कूलमध्ये लहान गटात शिक्षण घेत आहे.

 

Web Title: Shastri Nitin Koli was cremated at Dudhgad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.