शास्त्रीनगर मैदान उजळलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:22 AM2021-03-22T04:22:49+5:302021-03-22T04:22:49+5:30
गेले अनेक वर्षे हे मैदान केवळ टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गोवा या राज्यांतही प्रसिद्ध ...
गेले अनेक वर्षे हे मैदान केवळ टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, गोवा या राज्यांतही प्रसिद्ध आहे. या मैदानाचे नूतनीकरण गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यात प्रथम आंतरराष्ट्रीय सामन्यांकरिता लागणारे मापदंडानुसार ६५ यार्डचे संपूर्ण मैदान तयार करण्यात आले आहे. यात बॅर्म्युडा जातीचे विशिष्ट प्रकारचे गवताची लावणीही केली आहे. याकरिता सुमारे चार कोटी रुपयांचा निधीही यावर खर्च करण्यात आला आहे. त्याकरिता लागणारी यंत्रसामग्रीही असोसिएशनने महापालिका व आमदार निधीतून उभी केली आहे. त्यातीलच एक भाग असणारे चार विद्युत झोत बसविण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होते. ते पूर्ण झाले असून, त्याची चाचणी रविवारी रात्री घेण्यात आली. या झोतांमध्ये प्रत्येकी ४८ दिवे आहेत. त्यामुळे संपूर्ण मैदान उजळून निघते. या प्रकाशझोतात विशेष म्हणजे रात्रीचे सामने खेळताना उंच उडालेला चेंडूही स्पष्ट दिसतो. कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारचे मैदान प्रथमच होत आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंसह चाहत्यांनाही या मैदानात यापुढे रात्रीचे क्रिकेट सामने पाहण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे.
चौकट
गुजरात येथील नव्याने बांधण्यात आलेले मोंटेरो आंतरराष्ट्रीय मैदानात ज्या पद्धतीचे विद्युत झोत बसविण्यात आले आहेत. त्या कंपनीने कोल्हापुरातील या मैदानात हे झोत बसविले आहेत. याशिवाय काळ्या मातीतील दोन, तर लाल मातीतील पाच प्रकारच्या खेळपट्टया या मैदानात तयार केल्या आहेत. मैदानात आहे या परिस्थितीत किमान दहा हजार प्रेक्षक बसू शकतात, तर पॅव्हेलियनकरिता प्रस्तावही तयार आहे. सर्वसुविधा निर्माण झाल्या तर येथेही प्रथम श्रेणीसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामनेही होऊ शकतात. या मैदानाकरिता गेल्या कित्येक वर्षांपासून ज्येष्ठ क्रिकेटपटू काका पाटील व त्यांचे शेकडो सहकारी क्रिकेट चाहते परिश्रम घेत आहेत.
फोटो : २१०३२०२१-कोल-शास्त्रीनगर मैदान
आेळी : शास्त्रीनगर मैदानात रविवारी रात्री नव्याने बसविण्यात आलेल्या विद्युत झोताची चाचणी घेण्यात आली.
(छाया : नसीर अत्तार)