Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून शौमिका महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 10:28 AM2021-11-13T10:28:21+5:302021-11-13T10:36:03+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात झालेल्या बैठकीत हे नाव निश्चित करण्यात आले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आज (शनिवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषदेसाठी भाजपकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात झालेल्या बैठकीत हे नाव निश्चित करण्यात आले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आज (शनिवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील हे रिंगणात असून, त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. त्यांच्याविरोधात राहुल आवाडे, सुरेश हाळवणकर, प्रा. जयंत पाटील यांच्यासह महाडिक कुटुंबातील नावाची चर्चा होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत राहुल आवाडे आणि शौमिका महाडिक यांच्या नावावर चर्चा झाली.
आवाडे व महाडिक हे दोन्ही उमेदवार तगडे आहेत. मात्र, महाडिक कुटुंबातील व्यक्ती असेल तर ही लढत काटाजोड होऊ शकते, असा मतप्रवाह काही नेत्यांचा आहे. त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी सकाळी सात वाजता महादेवराव महाडिक यांच्या शिरोली पुलाची येथील घरी गेले. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते. शौमिका महाडिक यांनाच विधानपरिषदेच्या रिंगणात उतरविण्याचा आग्रह चंद्रकांत पाटील यांनी महाडिक यांच्याकडे धरला. यावर भाजपसह मित्रपक्षाच्या नेत्यांची इच्छा असेल तर शौमिका उभ्या राहतील, असे महाडिक यांनी सांगितल्याचे समजते.
शौमिका महाडिकच का?
- जिल्हा परिषदेच्या दोन निवडणुकांत मोठ्या फरकाने विजयी
- जिल्हा परिषद अध्यक्षपदी एकतर्फी निवड
- ‘गोकुळ’च्या अटीतटीच्या लढतीत विजयी
- विधानपरिषदेच्या गणितात जोडण्या लावण्यात महाडिक कुटुंब सक्षम.
- लोकसभा, विधानसभा, ‘गोकुळ’मधील पराभवानंतर सहानुभूतीचा फायदा होऊ शकतो.