Kolhapur- गोकुळ सभा: शौमिका महाडिक यांना कोल्हापुरात ‘अमूल’ वाढवायचाय!, अरुण डोंगळेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:45 PM2023-09-16T13:45:16+5:302023-09-16T13:46:07+5:30
शासन तुमचे होते मग संस्थांना मंजुरी का दिली
कोल्हापूर : शौमिका महाडीक या चांगल्या चाललेल्या ‘गोकुळ’ची बदनामी करत असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात ‘अमूल’ दूध संघ वाढवायचा आहे, असा आरोप ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला. निम्म्यापेक्षा अधिक संचालक मंडळाच्या सभांना यायचे नाही आणि सर्वसाधारण सभेत जाणीवपूर्वक दंगा करण्याची पद्धत त्यांची असून शासन तुमचे होते, तर वाढीव संस्थांची नोंदणी का थांबवली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.
अध्यक्ष डोंगळे म्हणाले, ज्या संस्थांच्या नावाने लेखी प्रश्न विचारले त्यांच्याकडून कोरे लेटरपॅड घेऊन शौमिका महाडीक यांनीच त्यांच्या नावावर प्रश्न विचारले आहेत. तरीही सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली; परंतु महाडीक यांना प्रश्नांची उत्तरे ऐकण्यापेक्षा गोंधळच घालयचा होता. चांगल्या चाललेल्या ‘गोकुळ’वर आरोप करून त्यांना ‘अमूल’ वाढवायचा आहे. त्या सातत्याने १२०० संस्था वाढविल्याचा आरोप करत आहेत. नोंदणी राज्य शासन देते, गेल्या दीड वर्षापासून त्यांची सत्ता आहे, मग त्यांनी नोंदणी का थांबवली नाही.
शेळके व पोलिसांत वाद
संस्था प्रतिनिधींना आत सोडण्यावरून ‘गोकुळ’चे संचालक बयाजी शेळके व पोलिसांत जोरदार खडाजंगी झाली. मुळात सभासदांकडील संस्था ओळखपत्र पाहून आत सोडले जात असल्याने वेळ लागत होता. त्यातूनही गोंधळात भर पडली.