‘शविआ’, नगराध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा डाव

By Admin | Published: November 3, 2015 09:35 PM2015-11-03T21:35:07+5:302015-11-04T00:09:00+5:30

दीपावलीनंतर अविश्वास ठराव : कॉँग्रेसच्या नव्या खेळीने इचलकरंजी नगरपालिकेत खळबळ

'Shavia', the civic commander | ‘शविआ’, नगराध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा डाव

‘शविआ’, नगराध्यक्षांना कोंडीत पकडण्याचा डाव

googlenewsNext

इचलकरंजी : जीवनावश्यक आणि कळीच्या विषयांवर शहर विकास आघाडी आणि नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कॉँग्रेसने चालू केला आहे. याचा अंदाज घेऊनच दीपावलीनंतर नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्याचाही कॉँग्रेसचा मनसुबा आहे. कॉँग्रेसच्या या नव्या खेळीने पालिकेत मात्र खळबळ उडाली आहे.
नगरपालिकेत कॉँग्रेसचे बहुमत आहे. नगराध्यक्षा बिरंजे कॉँग्रेसच्याच आहेत. मात्र, जानेवारीमध्ये बिरंजे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. बंडाला कॉँग्रेसचे विरोधक ‘शविआ’ने आणि राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे विरोधातील ‘शविआ’ची भूमिका बदलली आणि ते ‘सत्ते’त आले. गेल्या दहा महिन्यांत नगरपालिकेतील राजकारणाचे संदर्भही बदलले. आता कॉँग्रेसने ‘शविआ’ व नगराध्यक्षा यांच्याविरोधात मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपालिकेत एकूण असलेल्या ५७ नगरसेवकांपैकी कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व ‘शविआ’चे १७ नगरसेवक असे बलाबल आहे. उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती व आरोग्य सभापती ही पदे कॉँग्रेसकडे, तर बांधकाम समिती व शिक्षण समिती ही सभापतिपदे राष्ट्रवादीकडे आहेत. नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देणारे ‘शविआ’ व कारंडे गट वगळता ३६ नगरसेवक असूनही राजकीय कुरघोड्यांच्या खेळींमुळे कॉँग्रेसच्या सभापती व नगरसेवकांची कोंडी होत आहे. परिणामी, प्रभागातील विकासकामांमध्ये खोडा बसला आहे.
यासंदर्भात कॉँग्रेस समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष अशोक आरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक-नगरसेविकांच्या झालेल्या बैठकीत नगराध्यक्षा व शहर विकास आघाडीच्या राजकीय खेळीच्या विरोधात नगरसेवकांनी जोरदार तक्रारी केल्या. विशेषत: नगरसेविकांनी नगराध्यक्षांचे सहकार्य मिळत नसल्याबद्दल आक्षेप नोंदविला. त्यामुळेच ‘शविआ’ व नगराध्यक्षा यांना कोंडीत पकडण्यासाठी काळम्मावाडीतून थेट नळाद्वारे पाणी योजना, आयजीएम रुग्णालयाचे हस्तांतरण, भुयारी गटार योजना अशा कळीच्या विषयांवर विशेष सभा बोलाविण्याचे ठरविले आहे; तर याचा अंदाज घेत दीपावलीनंतर नगराध्यक्षांवर अविश्वास दाखल करण्याचाही निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)


काँग्रेसच्या ‘व्हिप’ची उत्सुकता
राष्ट्रवादीमध्ये कारंडे गट व जांभळे गट अशी फूट असून, त्यांच्याकडे अनुक्रमे चार व सात असे नगरसेवक आहेत. कॉँग्रेसमध्ये सुद्धा गटबाजी आहे; पण यापूर्वी गटबाजीमुळे महत्त्वाच्या विषयांवर दगाफटका मिळू नये, म्हणून कॉँग्रेसने ‘व्हिप’चे हत्यार वापरले आहे. आता या विशेष सभांमधूनसुद्धा कॉँग्रेस ‘व्हिप’ वापरणार का, याचीच उत्सुकता आहे.

Web Title: 'Shavia', the civic commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.