त्या माउलीचा मुलासोबत जाण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 04:31 PM2020-10-01T16:31:02+5:302020-10-01T17:03:13+5:30
उचगाव (ता. करवीर) येथील जयश्री बाळासाहेब पवार यांना घरी नेण्यासाठी मुलगा सचिन पवार हे बुधवारी दुपारी आले होते. मात्र त्यांनी मुलग्यासोबत जाण्यास नकार दिला. जयश्री पवार यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील जयश्री बाळासाहेब पवार यांना घरी नेण्यासाठी मुलगा सचिन पवार हे बुधवारी दुपारी आले होते. मात्र त्यांनी मुलग्यासोबत जाण्यास नकार दिला. जयश्री पवार यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना सरसावल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी गोपुडगे व रूपाली दलबंजन यांनी मंगळवारी दुपारी जयश्री पवार यांना पार्वती टॉकीज परिसरात बेवारस दिसल्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कार्यालयात पाठवले. याबाबत ह्यलोकमतह्णमधून बुधवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कुटुंबीनी विचारपूस सुरू केली.
बार असोसिएशनने लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शवली; तर दुपारी मुलगा सचिन पवार यांनी जैन बोर्डिंगमध्ये जाऊन आईची विचारपूस केली. तीन दिवस घरातून आले, आत्ता आलास काय? असे जयश्री यांनी झिडकारून दिल्याने ते तेथून निघून गेले.
आमच्या जन्मापासून आईचा तसा स्वभाव आहे. खूप औषधोपचार केले; मात्र तिच्या वागण्यात बदल होत नाही. तिच्या या स्वभावामुळे आम्ही तिघे भावंडे आजीकडेच राहिलो आणि तिथेच वाढलो. माझा पंक्चरचा व्यवसाय आहे. त्यातून कुटुंब चालवतो, आईला काही कमी पडू दिले नाही. तरीही ती घरी राहत नाही. तिच्या या वागण्याने वडीलही वैतागले होते. आताही आम्ही घराबाहेर काढलेले नाही. तिच्या सततच्या अशा वर्तनामुळे मीच कोल्हापूर सोडून जाण्याच्या मन:स्थितीत असल्याची माहिती जयश्री पवार यांचा मुलगा सचिन पवार यांनी लोकमतला दिली.