विशेष मुलीसाठी तिने सुरू केली स्वतंत्र शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:16 AM2018-10-18T00:16:01+5:302018-10-18T00:16:20+5:30
-प्रगती जाधव-पाटील लग्नानंतर करिअरची कोणतीही चिंता नाही, गृहकर्तव्य दक्षगृहिणी म्हणून जगायचं, ही संकल्पना त्यांच्या मनाशी अगदी पक्की होती. पतीची ...
-प्रगती जाधव-पाटील
लग्नानंतर करिअरची कोणतीही चिंता नाही, गृहकर्तव्य दक्षगृहिणी म्हणून जगायचं, ही संकल्पना त्यांच्या मनाशी अगदी पक्की होती. पतीची बँकेतील शाश्वत नोकरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबात आल्यानंतर त्यांना गोड बातमी समजली. संसार फुलविताना घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागताचा गोड कौतुक सोहळा पै पाहुण्यांकडून पार पडला आणि ‘ती’ चा जन्म झाला. जन्मानंतर अपेक्षित वाढ होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचं अवघं घर हादरलं! एकुलती एक मुलगी आणि तीही विशेष, हे सत्य पचवणं आणि स्वीकारणं त्यांना खूपच अवघड होऊ लागलं. सांगेल ते उपचार चार वर्षे घेतल्यानंतर परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळ त्यांनी एकवटलं आणि ‘ती’ला सोबत घेऊन वाई येथे विशेष मुलांसाठीचे प्रशिक्षण घेतलं. हे प्रशिक्षण घेऊन त्या थांबल्या नाहीत... रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी साताºयात विशेष मुलांसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा संकल्प मांडला. या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून मीरा बैरागी यांनी तीन दशके सक्षमपणे काम पाहिलं..!
मूळच्या हैद्राबाद येथील मीरा लग्नानंतर महाराष्ट्रात आणि तेही साताºयात आल्या. पती चंद्रशेखर बैरागी यांची बँकेची शाश्वत नोकरी आणि सधन कुटुंब यामुळे नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याचा कसलाच विचार मीरा बैरागी यांच्या डोक्यात आला नाही. त्यामुळे पहिल्यांदा गोड बातमी समजल्यावर कुटुंबीयांसमवेत सगळ्यांनी आनंद साजरा केला. फेब्रुवारी १९८५ मध्ये त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. सगळ्यांची प्रिय म्हणून प्रिया असं तिचं नामकरणही झालं. बाळलीलांच्या प्रतीक्षेत असणाºया सर्वांनाच घरातील या पहिल्या नातीच्या गोड कौतुकाचा भारी सोस! त्यामुळे प्रिया प्रत्येकाच्या लाडाची होती; पण सहा महिने उलटून गेले तरीही तिच्यात अपेक्षित प्रगती होत नसल्याने दवाखान्यात नेण्यात आले. तिची स्थिती लक्षात घेता ती ‘विशेष मुलगी’ असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं आणि बैरागी दाम्पत्यासह त्याचं कुटुंब हादरलं. यातून बरं करण्यासाठी कोणी सांगेल तिथं जाऊन उपचार घेतले.
नोकरी आणि कुटुंब या दोन्हींकडे दुर्लक्ष करून दोघांनीही प्रियाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं; हर तºहेचे उपचार घेऊनही उपयोग नसल्याचं चार वर्षांनी लक्षात आले आणि त्यांनी सर्व उपचारांना पूर्णविराम दिला. प्रियासारख्या साताºयातील अन्य विशेष मुलांसाठी काही तरी करण्याचं निश्चित करून मीरा बैरागी यांनी वाईत स्वतंत्र प्रशिक्षण घेतलं आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी विशेष शाळाही सुरू केली. आपल्या मुलीला सांभाळण्याबरोबरच मीरा बैरागी यांनी २०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून स्वावलंबी बनवलं.
आम्ही विशेष आहोत म्हणूनच...!
प्रियाच्या जन्मानंतर आम्ही पुरतं हादरलो आणि सावरलोही! आम्ही विशेष मुल सांभाळण्याची क्षमता ठेवतो म्हणूनच अशा मुलीचे पालक बनण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, असं आम्ही मानतो. सगळ्यांच्या घरांमध्ये सामान्य बालकाचं येणं आणि निसर्गानं निवडून आमच्याच घरात असं विशेष बाळ देण्याचं कारण आम्हाला तेव्हा समजलं नाही; पण प्रिया अशी जन्मली नसती तर मीरा बैरागी मुख्याध्यापकही झाल्या नसत्या अन् विशेष मुलांची आनंदबन ही स्वतंत्र शाळाही उभी राहिली नसती, असे बैरागी दाम्पत्य सांगते. प्रियाच्या जन्मानंतर तब्बल नऊ वर्षांनी जन्माला आलेला आमचा मुलगा सामान्य आहे. त्याच्याबरोबर तिचे भावनिक नातंही उत्तम आहे.
प्रियासाठी पहिले काही दिवस आम्ही खूप उपचार घेतले. मग आहे त्या परिस्थितीत तिचा स्वीकार करणं आणि तिला वाढवणं हे आम्ही निश्चित केलं आणि आमचा निम्मा ताण कमी झाला. तिच्या वाढीची गती संथ असली तरी तिच्यातील संवेदनशीलता सामान्यांना लाजवणारी आहे.
- मीरा बैरागी - ९९२२०२२५०५