CoronaVirus Lockdown : ‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊन, अस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 06:29 PM2020-04-09T18:29:44+5:302020-04-09T18:46:07+5:30
एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.
सचिन भोसले
कोल्हापूर : एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.
अशा लॉकडाऊन झालेल्या साने गुरुजी वसाहत येथील क्रशर चौकालगतच्या एका कॉलनीतील ‘अस्मिता’ची कहाणी काही औरच आहे.
अस्मिता ही रजनी व पंडित मारुलकर यांची एकुलती एक कन्या. जन्म १९७६ सालचा. नियमित मुलांसारखी ती बागडत होती. अचानकपणे १९७९ साली तिचे चालणे, बोलणे बंद झाले. ती केवळ हुंकार देऊ लागली. त्यानंतर आजतागायत ४२ वर्षांचा कालावधी गेला; ती अजूनही एका खुर्चीत अक्षरश: ‘लॉकडाऊन’ आहे.
तिच्या खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व सोपस्कर आईवडील करतात. त्यांची वयेही बघितली तर अनुक्रमे ७५ आणि ८० अशी आहेत. दोघेही न कंटाळता, केवळ ती पुन्हा पायावर उभी राहावी, या आशेने ही सेवा करीत आहेत. मारुलकर दाम्पत्याचा एकच कार्यक्रम म्हणजे अस्मिता पुन्हा उभी व्हावी, या आशेवर तिची एकसारखी सेवा, तीही न थकता करीत राहणे. दोघांनी तर कधी नातेवाइकांचे किंवा जवळच्या मंडळींचे लग्न, समारंभ, आदी पाहिलेलेच नाहीत. नातवंडांना खेळवायच्या वयात त्यांना मुलीला उचलावे लागत आहे. घरात काही बाजार वगैरे आणायचे म्हटले तर एकाला बाहेर जावे लागते, तर एकाला तिच्याबरोबर राहावे लागते.
गेल्या ४२ वर्षांनंतर मारुलकर पती-पत्नी आजही थकलेले नाहीत. केवळ त्यांची वये वाढली आहेत. त्यांचा उत्साह तर तरुण पिढीला लाजविणारा आहे. अस्मिता तर गेल्या ४२ वर्षांपासून एका खुर्चीत लॉकडाऊन आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन झालेल्या अस्मिताला आपण बरे होऊ, असा आशेचा किरण आहे. मग लोकांना २१ दिवसांचा लॉकडाऊन सहन का होईना?
अस्मिताचे वडील पंडित मारुलकर हे शिवाजी विद्यापीठातून उपकुलसचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तिवेतन मिळते. त्यांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे त्यांच्या व पत्नी रजनी यांच्या पश्चात त्यांच्या निवृत्तिवेतनातून अस्मिताचा चरितार्थ चालविण्यास सरकारने परवानगी द्यावी.
गेली ४२ वर्षे माझी मुलगी एकाच खुर्चीत लॉकडाऊनचा अनुभव घेत आहे. दीर्घ कालावधीनंतर तिला व आम्हांला ती पुन्हा उभी राहील, हा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनीही २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळून आपल्यासह इतरांच्याही जिवाला जपले पाहिजे.
- रजनी मारुलकर,
अस्मिताची आई