पुण्यात शेट्टींची गैरसोय नको म्हणूनच दुसरीकडे गेलो
By admin | Published: March 5, 2017 12:28 AM2017-03-05T00:28:37+5:302017-03-05T00:28:37+5:30
सदाभाऊ खोत : मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच; मतभेद नसल्याचा पुनरुच्चार
सांगली : पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहात खासदार राजू शेट्टी उतरल्याचे कळल्यावर त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची गैरसोय नको म्हणूनच मी दुसऱ्या विश्रामगृहाकडे गेलो होतो. यामध्ये शेट्टींपासून दूर जाण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच असून, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिले.
शुक्रवारी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शेट्टी आल्याचे समजल्यानंतर खोत यांनी तेथून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला होता. त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. शनिवारी खोत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. संघटनेत पूर्वी होतो आणि भविष्यातही असेन.
खा. शेट्टी यांच्याशी असलेल्या वादावर स्मितहास्य करून, आम्ही दोघे एकच असून, भविष्यातही आम्ही एकत्रच राहू. जे काही बोलायचे, ते बोललो आहे. आता आणखी काही बोलणार, असे सांगत ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात निघून गेले. (प्रतिनिधी)
तासगावला जागतिक दर्जाचे बेदाणा निर्यात केंद्र
तासगावात जागतिक दर्जाचे बेदाणा निर्यात केंद्र सुरू करणार आहे.
तूरडाळीचे दर स्थिर झाल्यामुळे आणि तुरीचे उत्पादनही यावर्षी विक्रमी झाल्याने कडधान्याच्या साठ्यावरील निर्बंध उठविले आहेत.
राज्यातील २१९ बाजार समित्यांना गोदामे बांधण्यासाठी शासन अनुदान देणार आहे. याशिवाय, शेतीशी संबंधित संस्थांनी शासनाकडे मागणी केल्यास त्यांनाही गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येईल, असेही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.