लग्नानंतरही तिने पटकाविली तीन सुवर्णपदके
By Admin | Published: November 23, 2014 12:41 AM2014-11-23T00:41:55+5:302014-11-23T00:41:55+5:30
नाशिक येथे झालेल्या क्रीडा महोत्सवात स्वाती पाटील-जाधवचे यश
एकनाथ पाटील / कोल्हापूर
विद्यार्थिदशेपासूनच खेळाची आवड... लग्नानंतर खेळाला ‘ब्रेक’ लागेल अशी शंका मनात होती; परंतु पती सागर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे चार व दीड वर्षाच्या दोन मुलींना घरामध्ये ठेवून तिने थेट नाशिक गाठले. जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर स्वाती पाटील-जाधवने मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवात तीन सुवर्णपदके पटकावून विवाहित महिला खेळाडूंना एक नवी प्रेरणा देत खेळासोबत आपली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
देशात क्रीडा क्षेत्रात महिलांची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. महाराष्ट्राचा विचार करता धावपटू कविता राऊत, राही सरनोबत, आदी खेळाडूंनी राज्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. स्वाती पाटील-जाधव यांचे माहेर शिंगणापूर (ता. करवीर). लग्नानंतर त्या सासरी कोल्हापुरात राहू लागल्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कोल्हापूरमधील केंद्र असलेल्या डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयात कला शाखेतील पदवीच्या तृतीय वर्षात त्या शिकत आहेत. पती सागर जाधव हे स्वत:चा व्यवसाय करतात. त्यांना चार वर्षांची निहारिका आणि दीड वर्षाची रणविता या दोन मुली आहेत. या तिघांच्या सहकार्याने त्या स्पर्धेत सहभागी झाल्या. संसाराचा भार सांभाळत सकाळी सात ते दहा मैदानावर धावणे, उंचउडी, लांबउडी याचा त्या कसून सराव करतात. निहारिकाला त्या मैदानावर घेऊन जातात. दीड वर्षाच्या रणविताला सांभाळण्याचे कार्य आई-वडिलांसह बहिणीने स्वीकारल्यामुळे त्यांना रोजचा स्पर्धेचा सराव करणे शक्य झाले.
सध्या त्या पदवीच्या शेवटच्या वर्षात असल्यामुळे त्यांनी खेळासोबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला आहे. त्यासाठीच्या योग्य मार्गदर्शनासाठी त्यांनी खासगी क्लासेसही सुरू केले आहेत.
मनात इच्छा असेल तर आयुष्यात कोणतीच गोष्ट मला अशक्य वाटत नाही; कारण लग्नानंतर माझ्या खेळाला ब्रेक लागेल, अशी शंका मनात होती. पती सागर यांच्याशी मी या विषयावर मनमोकळा संवाद साधला. त्यांनीदेखील माझ्यावर विश्वास दाखविला. अर्थात या विश्वासाला तडा न देण्याची तयारी मी प्रथमत: दाखविल्याने ते शक्य झाले. मला आयुष्यात यश मिळवायचेच आहे. त्यासाठी कठोर मेहनत करण्याची मनाशी खूणगाठ बांधली आहे. क्रीडागटातून पीएसआय, डीवायएसपी होण्यासाठी अभ्यास सुरू आहे. त्या दृष्टीने दिनक्रम ठरवून त्यात स्वत:ला बांधून घेतले आहे. या शिस्तीचा आज मला फायदा झाला. केंद्रीय क्रीडा महोत्सवात लांबउडी, ८०० मीटर धावणे व १०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणे शक्य झाले. या विजयाचे श्रेय महाविद्यालयातील प्राचार्य, क्रीडाशिक्षक इम्तियाज शेख यांच्यासह पती सागर व माझ्या दोन मुलींनादेखील जाते. त्यांनी सोबत येण्याचा हट्ट धरला असता तर कदाचित मला स्पर्धेपासून दूर राहावे लागले असते. महिलांनी स्वत:ला कमी लेखण्याचा स्वीकार केला आहे. हा दृष्टिकोन अगोदर बदलण्याची गरज असल्याचे मला वाटते. कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. त्यासाठी फक्त महत्त्वाकांक्षा असावी लागते. तीन सुवर्ण घेऊन दि. २ डिसेंबर रोजी कोल्हापूरला सन्मानाने जाणार आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
................................
फोटो : २२११२०१४-कोल-स्वाती पाटील नावाने आहे.