भोगावतीसाठी शेका पक्ष सत्तारुढ पी.एन.गटासोबत, भोगावतीच्या राजकारणाला कलाटणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 04:55 PM2023-11-05T16:55:57+5:302023-11-05T16:56:10+5:30
भोगावती वाचवण्यासाठी भोगावतीचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील यांनी कोणतीही तडजोड स्वीकारण्याची भूमिका ठेवली होती. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील गटाने सतारूढ पी.एन.पाटील गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
अमर मगदूम
राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माघारीला अवघे काही दिवस शिल्लक असताना धक्कादायक राजकीय उलाढाली होत आहेत. आमदार पी एन पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील भोगावतीसाठी एकञ येण्यावर शिक्कामोर्तब झाले. भोगावतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ए वाय पाटील गटा बरोबर शेकापक्ष सतारुढ पी.एन.पाटील गटासोबतच राहणार आहेत.
भोगावती वाचवण्यासाठी भोगावतीचे अध्यक्ष आमदार पी एन पाटील यांनी कोणतीही तडजोड स्वीकारण्याची भूमिका ठेवली होती. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील गटाने सतारूढ पी.एन.पाटील गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
आज झालेल्या धक्कादायक घडामोडीत माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी सत्तारूढ आमदार पी एन पाटील गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
आघाडीची घोषणा आज
शुक्रवारी माजी आमदार शेका पक्षाचे नेते संपतराव पवार पाटील (सडोलीकर) यांच्या निवासस्थानी करवीर व राधानगरी तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील हे सत्तारूढ गटासोबतच राहण्यासाठी आग्रही होते. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर सर्वाधिकार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांना देण्यात आले. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत सत्तारूढ गटा सोबतच राहण्याचा निर्णय घेण्यात आला. आज काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, गोकुळचे संचालक प्रा. किसन चौगुले, संपतराव पवार-पाटील यांचे चिरंजीव क्रांती पवार-पाटील, अक्षय पवार-पाटील, केरबा भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत या नव्या युती घोषणा होणार आहे.