‘शेकाप’चा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:28 AM2021-02-09T04:28:19+5:302021-02-09T04:28:19+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. ११) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी ...
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. ११) दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस, माजी आमदार संपतराव पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
बाजार समित्यांसह जीवनाश्यक वस्तू कायद्यात बदल, कंत्राटी शेती, आदी शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र सरकार दखल देत नाही. शेतकऱ्यांपेक्षा ठरावीक भांडवलदार उद्योगपतींचे हित जोपासले जात आहे. त्यातच गॅस, डिझेल, पेट्रोलच्या दरात भरमसाट वाढ करून सामान्य माणसांचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. याविरोधात जनमानसात असंतोष आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळातील वीज बिले पूर्ण माफ करावीत, सक्तीने वीज बिलांची वसुली करू नये, उसाची बिले एकरकमी चौदा दिवसांत मिळावीत, नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या, या मागण्यांसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता ‘शेकाप’ कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संपतराव पवार यांनी केले. यावेळी भारत पाटील, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर उपस्थित होते.