शेखर गोरे यांना अखेर अटक
By Admin | Published: June 23, 2015 11:40 PM2015-06-23T23:40:00+5:302015-06-24T00:53:27+5:30
व्यापाऱ्यावरील हल्ला : प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात
सातारा : आंधळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष निवडीच्या दिवशी आंधळी आणि त्यानंतर दहिवडी येथे झालेली राडेबाजी आणि व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते पोलिसांना शरण आले. दरम्यान, प्रकृती अस्वास्थ्यामुळे सायंकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माण तालुक्यातील आंधळी गावच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांचे तुल्यबळ गट आहेत. या सोसायटीच्या अध्यक्षपदासाठी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक होणार होती. तथापि, निवडणूक अधिकारीच तेथे पोहोचू शकले नाहीत म्हणून निवडणूक रद्द झाली. त्यामुळे दोन्ही गटांत तणाव निर्माण होऊन दगडफेक आणि हाणामारी झाली होती. त्यानंतर या घटनेचे दहिवडीतही पडसाद उमटले होते.
अध्यक्ष निवडीच्या वेळी जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता सम्राट गांधी याने शेखर गोरे यांना खुन्नस दिली होती. व्यापारी शेखर गांधी हे सम्राटचे काका होत. आंधळीतील घटनेचा राग मनात धरून शेखर गांधी यांना दहिवडीत जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी शेखर गोरे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शेखर गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळताना न्यायालयाने त्यांना दोन आठवड्यांत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी दहा वाजता गोरे दहिवडी पोलीस ठाण्यात हजर झाले.
दुपारी साडेबारा वाजता पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी त्यांना दहिवडी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने गोरे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास गोरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.