राजकारणापलिकडे पाहणारे शेखरसर
By admin | Published: December 4, 2015 10:42 PM2015-12-04T22:42:29+5:302015-12-05T00:22:44+5:30
कोकण किनारा
खरं तर राजकारणाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळाले असतानाही आणि राजकारणात हातपाय पसरण्यासाठी कोणतेही श्रम करणे आवश्यक नसतानाही त्यांनी बराच काळ उमेदवारी केली. आज राजकारणात एक मोठा टप्पा गाठलेला असतानाही त्यांच्या वागण्या - बोलण्यात राजकारण दिसत नाही. कोणाला चेपायचं, कोणाला वर काढायचं असली गणितं त्यांच्या डोळ्यासमोर नसतात. पक्षाबाबतची निष्ठा जपतानाच शिक्षण संस्था वाढवण्याचं स्वप्न जोमाने पूर्ण करणे हाच त्यांचा ध्यास. म्हणूनच शेखरसर ही त्यांची मोठी ओळख बनली आहे.
शेखर निकम! माजी खासदार कै. गोविंदराव निकम यांचे सुपुत्र अशी ओळख कायम ठेवत सह्याद्री शिक्षण संस्थेचा डोलारा सांभाळणारे आणि झपाट्याने विस्तार करणारे कार्याध्यक्ष अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. गलिच्छ राजकारण न करणारा जिल्हाध्यक्ष हीदेखील त्यांची महत्त्वाची ओळख.
नुकताच योग आला त्यांच्या सावर्डेतील संस्थानाला भेट देण्याचा. संस्थानच म्हणावं लागेल, इतका मोठा डोलारा त्यांनी उभा केला आहे. या साऱ्या कामात गोविंदराव निकम यांच्या दूरदृष्टीचा वाटा असला तरी आहे ते टिकवायचे आणि पुढे वाढवायचे काम शेखर निकम यांनी केले आहे. १९७२ साली गोविंदराव निकम जिल्हा परिषदेत सभापती झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, खासदार अशी मोठी पदे त्यांनी भूषवली. ज्या काळात शरद पवार यांची कारकीर्द विस्तारली, त्याच काळात गोविंदराव निकम यांच्याकडे विविध महत्त्वाची पदे होती. त्यामुळे साहजिकच शरद पवार यांच्याशी त्यांचा थेट संपर्क होता. हे सारे बाळकडू शेखर निकम यांना लहानपणापासूनच मिळाले. गोविंदराव निकम यांच्या कारकीर्दीचे सर्व टप्पे शेखर निकम यांनी जवळून पाहिले आहेत. त्यामुळेच शेखर निकम यांच्या राजकीय वर्तुळातील वावराला परिपक्वता दिसते.
ज्या काळात जिल्ह्यात फक्त काँग्रेस पक्षच आघाडीवर होता, त्या काळातील सगळ्या जडणघडणी शेखर निकम यांनी पाहिल्या आहेत. कदाचित म्हणूनच राजकीय माणसाला न शोभणारे अनेक गुण त्यांच्याकडे दिसतात. कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेणे, ही राजकारणातील सर्वाधिक लोकप्रिय गोष्ट. आपल्या कामाचे श्रेय हक्काने मागणारे राजकारणी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय हट्टाने लाटण्यात पटाईत असतात. पण शेखरसरांबाबतचा अनुभव वेगळाच येतो.
गोविंदराव निकम यांचे मूळ गाव आपसिंगे. या गावातील अनेक मुलांना एकही रूपया फी न घेता सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये मोफत शिकवण्यावर शेखरसरांनी भर दिला आहे. आपल्या मूळ गावाबद्दल आणि ग्रामस्थांबद्दल आपुलकी वाटते, यातूनच त्यांनी अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल केले आहे. पण, त्याचा त्यांनी कधीही गाजावाजा केलेला नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वडापावची टपरी चालवणारे एक गृहस्थ आपल्या मुलाला उच्च कृषी शिक्षण देऊ इच्छित होते. मात्र, फॉर्म भरायची वेळ आली तेव्हा त्यासाठी लागणारे ५00 येरूपयेही त्यांच्याकडे नव्हते. कोणीतरी सांगितले की, शेखर निकम यांना भेटा. ते घाबरत घाबरत आले. मुलाची गुणवत्ता बघून शेखरसरांनी एकही रूपया फी न घेता त्या मुलाला प्रवेश दिला. संस्थेच्या मेसमध्येच त्याच्या भोजनाचीही व्यवस्था केली. तो मुलगाही अतिशय प्रामाणिक होता. आपण मोफत राहतो, खातो असं होऊ नये, म्हणून तो मेसमध्ये काम करायचा. चांगल्या गुणांनी तो कृषी पदवीधर झाला आणि आता दिल्लीमध्ये एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे.गावातल्या मुलांना दिलेलं मोफत शिक्षण असेल किंवा सिंधुदुर्गातील वडापाव विक्रेत्याच्या मुलासाठी पुढे केलेला मदतीचा हात असेल, खरं तर श्रेय घेण्याचे मोठे विषय. पण शेखरसरांनी आजवर कधीही त्याचं भांडवल केलेलं नाही. अगदी चिपळूण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्यानंतरही त्यांनी या गोष्टी आपल्या फायद्यासाठी वापरलेल्या नाहीत.
या भेटीत त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून एक-एक गोष्टी ओघानेच पुढे येत होत्या. आपली शेखी मिरवण्याची कुठलीच भावना त्यात नव्हती. हे संस्थेने केलेलं काम आहे, असेच ते सांगत होते. संस्थेच्या खरवते येथील कृषी महाविद्यालयाच्या विविध शाखा विस्तारत असल्याचे त्यांनी स्वत: फिरून दाखवले. कोकणातील कृषीपूरक वातावरणाला अनुसरून लागवडीसाठी तरूणांनी पुढे यावे, यासाठी संस्थेचा प्रयत्न असतो, हेही ते आवर्जून सांगतात. आजची नाही तर आणखी दहा वर्षांनी लागणारी गरज भागवण्यासाठीची तयारी शेखरसरांनी आतापासूनच केली आहे. म्हणूनच संस्थेचा परिसर विस्तीर्ण आहे. बड्याबड्या इमारती दिमाखात उभ्या आहेत. या इमारतीला शिक्षणाचाच गंध येतो. इथे राजकारणाचा कसलाच संबंध नाही. सावर्डेत आॅफीस असले तरी त्यांचा रोज खरवतेच्या महाविद्यालयात जायचा उपक्रम चुकत नाही. अगदी मुंबईहून आल्यावरही ते वेळ काढून तिकडे जाऊन माहिती घेतात. राजकारणातही पारंपरिक राजकारण न करणारे शेखरसर शिक्षणाच्या क्षेत्रात तर राजकारणापलिकडेच पाहतात. म्हणूनच गोविंदराव निकम यांनी सुरू केलेला ज्ञानयज्ञ इतक्या वर्षांनंतरही सुरूच आहे, किंबहुना शेखर निकम यांच्या काळात तो अधिकच जोमाने धगधगत आहे.
मनोज मुळ्ये