हिरण्यकेशी नदीवर शेळप ते सोहाळे ११ ते १९ एप्रिल उपसाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:36+5:302021-04-09T04:26:36+5:30
साळगाव, देवर्डे, दाभिल व शेळप बंधारा दरम्यानच्या पाणी साठ्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. उपसाबंदी व उपसा सुरू करण्याचा ...
साळगाव, देवर्डे, दाभिल व शेळप बंधारा दरम्यानच्या पाणी साठ्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. उपसाबंदी व उपसा सुरू करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ११ ते १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात १ ते ७ मे, तर तिसऱ्या टप्प्यात १९ मे ते पुढील आदेश येईपर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आली आहे.
याशिवाय पहिल्या टप्प्यात २० ते ३० एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात ८ ते १८ मे दरम्यान उपसा सुरू ठेवण्यात येणार आहे. उपसाबंदी कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करता येणार नाही. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजना उपसा बंदीमधून वगळण्यात आल्या आहेत. उपसाबंदीची माहिती शेळप ते सोहाळे दरम्यानच्या ग्रामपंचायतीमध्ये लावली आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन शाखा अभियंता एन. डी. मळगेकर यांनी केले आहे.
बैठकीस तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता, जलसंधारण विभागाचे अधिकारी, शेळप ते सोहाळे दरम्यानच्या विविध गावचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.