महिलांनी आघाडी उघडल्यामुळे शेळके यांचा विजय निश्‍चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:44+5:302021-04-16T04:25:44+5:30

बेळगाव : महिला या पुरुषांपेक्षा नेहमीच कणखर असतात. एखादा लढा हाती घेतला की तो यशस्वी केल्याशिवाय त्या गप्प बसत ...

Shelke's victory is assured as the women open the lead | महिलांनी आघाडी उघडल्यामुळे शेळके यांचा विजय निश्‍चित

महिलांनी आघाडी उघडल्यामुळे शेळके यांचा विजय निश्‍चित

Next

बेळगाव : महिला या पुरुषांपेक्षा नेहमीच कणखर असतात. एखादा लढा हाती घेतला की तो यशस्वी केल्याशिवाय त्या गप्प बसत नाहीत. तेव्हा शुभम शेळके यांना विजयी करण्यासाठी महिलांनी उघडलेली आघाडी निश्चित यशस्वी होईल, याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे तडफदार उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ महिला आघाडीच्यावतीने आज, गुरुवारी दुपारी आयोजित महिलांचा मेळावा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्त्या या नात्याने रूपाली चाकणकर बोलत होत्या.

देशात अच्छे दिन आणण्याऐवजी महागाईचा कळस गाठून भाजप सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करून सोडले आहे. नागरिकांसाठी प्रारंभी जन-धन योजनेचे पैसे खात्यात घालणाऱ्या भाजप सरकारने तेच पैसे महागाई वाढवून दामदुपटीने पुन्हा वसूल केले आहेत. भाजप सीमा भागातील मराठी माणसांच्या समर्थनात कधीही उभा राहिलेला नाही. भाजपच्या कारकिर्दीमध्ये मराठी जनतेवर अन्यायच झाला आहे. बेळगावात सुवर्ण विधानसौधची उभारणी, दोनदा बरखास्त झालेली बेळगाव महापालिका, महापालिका इमारतीचे स्थलांतर, अलीकडची महापालिकेसमोरील राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या लाल -पिवळा झेंड्याची घटना आदी सर्व गोष्टी कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर असताना घडलेल्या आहेत, याचा विचार मराठी बांधवांनी करावा, असे आवाहन चाखणकर यांनी केले.

राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने विकासाच्या बाबतीत बेळगावकडे दुर्लक्ष केले आहे. अलीकडच्या काळात शहरात जो विकास झाला आहे तो केंद्राने मंजूर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून झालेला आहे. यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही, असे सांगून बेळगाव लोकसभा मतदार संघातील ही निवडणूक पोटनिवडणूक असली तरी तिला कमी न समजता सर्वांनी एकजुटीने आपली ताकद दाखवून शुभम शेळके यांना विजयी करताना विरोधकांना धूळ चारावी, असे आवाहन रूपाली चाखणकर यांनी केले.

.

याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, उपाध्यक्ष सुधा भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी रेणू किल्लेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले

फोटो:समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या महिला मेळाव्यात छत्रपती शिवरायांचे पूजन करताना रुपाली चाकनकर सोबत रेणू किल्लेकर, सरिता पाटील, सुधा भातकांडे, सरस्वती पाटील.

Web Title: Shelke's victory is assured as the women open the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.