हद्दवाढीच्या विरोधात शिरोली बेमुदत बंद

By admin | Published: February 20, 2016 12:33 AM2016-02-20T00:33:40+5:302016-02-20T00:42:30+5:30

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ : सोमवारी महामार्ग रोखण्याचा इशारा

Sheololi stalled against the hike | हद्दवाढीच्या विरोधात शिरोली बेमुदत बंद

हद्दवाढीच्या विरोधात शिरोली बेमुदत बंद

Next

शिरोली : कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीविरोधात आयोजित बेमुदत बंदला गावातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले.महानगरपालिकेच्या हद्दीतून शिरोली वगळून स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी द्यावी, यासाठी शुक्रवारपासून शिरोली बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामपंचायत चौकात महापालिकेच्या हद्दवाढीचा निषेध व्यक्त करून घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व नागरिकांनी मोटारसायकल रॅली काढली आणि सर्व व्यापाऱ्यांना, हॉटेल व्यावसायिक, ट्रान्स्पोर्ट व्यवसाय, मार्बल मार्केट यांना बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यास सांगितले. ग्रामपंचायत चौकात रॅली आल्यानंतर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन आणखी तीव्र करायचे आहे. जोपर्यंत हद्दवाढीतून शिरोली गावचे नाव वगळून स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत शिरोली बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत सदस्य गोविंद घाटगे म्हणाले, कोणत्याही नेत्यांच्या दारात जायचे नाही. शिरोलीचा हद्दवाढीला विरोध आहे, हे या नेत्यांना माहिती नाही का? न्यायासाठी सोमवारी (दि. २२) महामार्ग रोखू.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले, हद्दवाढ विरोधात आता संपूर्ण शिरोली एक झाली आहे, काही झाले तरी हद्दवाढ होऊ द्यायची नाही. खासदार, आमदार यांनी झोपेचे सोंग घेतले आहे; पण या लोकप्रतिनिधींनी अजूनही जागे होऊन शिरोली गावचे नाव हद्दवाढीतून काढावे; अन्यथा वेळप्रसंगी आमदार, खासदार यांच्या घरांवरही मोर्चा काढायला जनता घाबरणार नाही.
या आंदोलनास ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, मार्बल मार्केट असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, मेडिकल आणि डॉक्टर असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. यावेळी उपसरपंच राजू चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, बबन संकपाळ, शिवसेना तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, सलीम महात, सुरेश यादव, लियाकत गोलंदाज, विजय जाधव, शिवाजी कोरवी, हरी पुजारी, बापू पुजारी, रणजित केळुस्कर, हिम्मत सर्जेखान, मधुकर पद्माई, अविनाश जाधव, अनिल कोळी, रामचंद्र बुडकर, अशोक स्वामी, मुकुंद नाळे, नितीन चव्हाण, संदीप तानवडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)

शिरोलीत उद्या
१९ गावांची बैठक
महानगरपालिका हद्दवाढीच्या विरोधात उद्या, रविवारी सर्व १९ गावांतील प्रतिनिधींची एकत्रित बैठक शिरोली येथे होणार आहे. या बैठकीला आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार संपतराव पवार, तसेच सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व प्रतिनिधी उपस्थित राहून आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत.


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
मंगळवारी मुंबईत बैठक
महापालिकेची हद्दवाढ रद्द करावी, यासाठी मंगळवारी मुंबईत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये हद्दवाढ रद्द करण्यात यावी, याबाबत चर्चा होणार आहे.

Web Title: Sheololi stalled against the hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.