कालकुंद्री येथे गव्याच्या हल्यात मेंढपाळ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:24 AM2021-04-18T04:24:31+5:302021-04-18T04:24:31+5:30
कालकुंद्री ता. चंदगड शिवारात गव्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला. बसाप्पा बिराप्पा हारुगेरी (३०, रा. सलामवाडी, ता. ...
कालकुंद्री ता. चंदगड शिवारात गव्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला. बसाप्पा बिराप्पा हारुगेरी (३०, रा. सलामवाडी, ता. हुकेरी, जि. बेळगाव) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवार, १७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबतची हकीकत अशी, सलामवाडी येथील बिराप्पा हारुगेरी हे आपल्या कुटुंबासह मेंढ्यांचा कळप घेऊन कालकुंद्री परिसरात गेल्या महिनाभरापासून फिरत आहेत. दोन दिवसांपासून कालकुंद्री गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सय्यद तलाव नजीक बाबू कामाना पाटील यांच्या शेतात मेंढ्या बसवल्या होत्या. आज दुपारी बसाप्पा हे आपले नातेवाईक सिद्धाप्पा कासेवगोळ व हालाप्पा कासेवगोळ यांना सोबत घेऊन मेेंढरांच्या कळपाला पाणी पाजण्यासाठी किटवाड धरण जलाशयाकडे वजर शेत परिसरात गेले होते. यावेळी अचानक होसूर ओढ्याच्या दिशेने गवा येत असल्याचे पाहून मेंढ्या बिथरल्या. गव्याने मेंढ्यांवर हल्ला करू नये यासाठी धाडसाने बसाप्पा गव्याला हकलण्यासाठी गेले असता गव्याने समोरून छातीवर धडक देऊन गंभीर जखमी केले. इतरांच्या आरडाओरड्याने गवा बाजूला गेला. जखमीवर कालकुंद्रीत खाजगी डॉक्टरकडे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तात्काळ दड्डी येथील आरोग्य केंद्र व नंतर हत्तरगी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
फोटो ओळी :-- जखमी बसाप्पा हारुगेरी.