शेटे यांचे आरोप बिनबुडाचे व बदनामीच्या हेतूने : भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:24+5:302021-07-07T04:28:24+5:30
कोल्हापूर : माझ्या शैक्षणिक अर्हतेबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी धारण करत असलेल्या पदवी आणि पदविका ह्या शिवाजी विद्यापीठ ...
कोल्हापूर : माझ्या शैक्षणिक अर्हतेबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी धारण करत असलेल्या पदवी आणि पदविका ह्या शिवाजी विद्यापीठ व ऑल इंडिया इंन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधून नियमानुसार प्राप्त केलेल्या असून, त्या वैध आहेत आणि नियुक्तीच्या वेळी त्या मी परिवहन उपक्रम व महानगरपालिका प्रशासनास सादर केल्या आहेत, असे स्पष्टीकरण अंतर्गत लेखापाल संजय भोसले यांनी दिले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भूपाल शेटे खोटे व बिनबुडाचे आरोप करून माझी नाहक बदनामी करत आहेत. अंतर्गत लेखा परीक्षक पदासाठी आवश्यक असलेली ॲडव्हान्स अकौंटंसी ॲण्ड ऑडिटिंग या स्पेशल विषयासह बी. कॉम पदवी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधून एल.जी.एस. पदवीधर व सुपरवायझरी केडरसाठी असलेली पदविका धारण केली आहे. डी.एल.जी.एफ.एम. , स्थानिक स्वराज्य संस्थांचे वित्तीय व्यवस्थापन पदविका धारण केली आहे. सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणासाठी आवश्यक असलेली जी.डी.सी. ॲण्ड ए. हा कोर्स उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही. तरीसुद्धा दिशाभूल करून शेटे माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केएमटीकडे अकौंटंट पदावर माझी केंव्हाही नियुक्ती झालेली नाही किंवा महानगरपालिकेकडील अधीक्षक पदावरील माझ्या समायोजनाचा या पदावरील नियुक्तीशी काहीही संबंध नाही, तरीसुद्धा औद्योगिक न्यायालयातील कालबाह्य निकालाचा उल्लेख करून अधीक्षक पदावरील नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा कांगावा शेटे करत आहेत. माझे अधीक्षक पदावर झालेले समायोजन महासभेच्या मान्यतेनुसार झाले. त्यामुळे नियुक्ती बनावट म्हणणे योग्य नाही, असेही भोसले यांनी म्हटले आहे.