कार्यकर्त्यांपेक्षा शेट्टींनी अंगावर यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:27 AM2018-02-26T00:27:15+5:302018-02-26T00:27:15+5:30
कोल्हापूर : बहुजन समाजातील लोकांना त्याच समाजाच्या अंगावर घालायचे, ही खासदार राजू शेट्टी यांची जुनी खेळी आहे. चार कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या देऊन माझ्या अंगावर सोडण्यापेक्षा त्यांनी स्वत:च अंगावर यावे, असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकातून दिले. माझे मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता हेच शेट्टींच्या संतापाचे कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माढा (जि. सोलापूर) येथे शनिवारी कृषी राज्यमंत्री खोत यांच्या गाडीवर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाची तोडफोड केली तर खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर बोचरी टीका करत ‘सरकारचे गुणगान गाणाºयांना दगड खावे लागतील,’ असा इशारा दिला आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोत म्हणाले, राजू शेट्टी यांची लढाई आता सरकारसोबत नव्हे तर सदाभाऊंबरोबर आहे. माझ्याकडे असलेले मंत्रिपद व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर असलेला विश्वास हे शेट्टींच्या संतापाचे मुख्य कारण आहे. त्यांनी शेतकरी चळवळ आत्मकेंद्रीत केली आहे. आपल्यापेक्षा दुसरा कोणी मोठा झालेला त्यांना कधीच सहन झालेले नाही. आतापर्यंत त्यांनी आत्मकेंद्रीत विचार आणि व्यक्तिगत आकस केल्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
आता त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने ते गुद्द्यावर आले आहेत. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचा ठेका शेट्टींना कोणी दिला? ’ असा सवाल करत. ऊस दराचा प्रश्न सोडवण्याची माझी औकात आहे की नाही, हे तपासण्याचे काम शेट्टींनी करू नये. आयुष्यातील तीस वर्षे शेतकºयांच्या भल्यासाठी चळवळीत घातली. आता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार, असा इशाराही राज्यमंत्री खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला.
बहुजन समाजच धडा शिकवेल
आतापर्यंत बहुजन समाजातील लोकांच्या
बळावर मोठे झालात, त्याच समाजावर तुम्ही
पलटला पण लक्षात ठेवा हाच समाज तुम्हाला
धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,
असा इशारा राज्यमंत्री खोत यांनी पत्रकातून दिला आहे.