Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक
By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 13:38 IST2025-01-06T13:37:46+5:302025-01-06T13:38:18+5:30
संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला

Kolhapur: शेतकरी संघ झाला गरीब, नेते झाले श्रीमंत; एकेकाळी आशिया खंडात होता नावलौकिक
एकेकाळी आशिया खंडात नावलौकिक असलेला व डोळे झाकून खरेदी करावी, असा ग्राहकांचा विश्वास मिळवलेल्या शेतकरी सहकारी संघाची अवस्था आता खूपच वाईट झाली आहे. संघ हा सहकारी संस्था असली तरी खरेदी-विक्री संस्था आहे. मार्केटिंगचा गाढा अभ्यास व दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या ताब्यात संघाच्या चाव्या होत्या तोपर्यंत संघाचा ‘बैल’ धष्टपुष्ट होता. मात्र, संघ राजकीय मंडळींच्या ताब्यात गेला आणि ‘बैल’ घाईला आला. संघाची सध्याची अवस्था व आगामी काळात ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी काय करायला हवे, याचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून..
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा ग्राहकांना ‘मॉल’ संस्कृतीकडे आकर्षित करण्याचे काम शेतकरी सहकारी संघाने केले. संघाच्या बझारमधील कोणतीही वस्तू ग्राहक अक्षरश: डोळे झाकून खरेदी करत होते, इतका विश्वास संघावर होता. त्याला कर्मचाऱ्यांबरोबरच संघाचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या नि:स्वार्थी नेतृत्व कारणीभूत होते.
पण, अलीकडील वीस-पंचवीस वर्षांत पूर्वीच्या नेतृत्वांनी मेहनतीने समाजमनात निर्माण केलेला विश्वासाचा चिरा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. संघात विश्वस्त म्हणून केलेले गब्बर झाले; पण संघ अधिकच अशक्त होत गेला. नेत्यांनी सध्याच्या विश्वस्तांचे वेळीच कान उपटले नाही तर सहकाराचे आदर्श मंदिर जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही.
शेतकरी व ग्राहकांना माफक दरात वस्तू मिळाव्यात, त्याची फसवणूक होऊ नये यासाठी शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली. स्वर्गीय तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर आदी मंडळींनी अगदी साचेबद्ध कारभार करत संघाचे नाव आशिया खंडात नेले. संघाच्या नावलौकिक वाढण्यासाठी जेवढे योगदान विश्वस्तांचे होते, तेवढेच तत्कालीन कर्मचाऱ्यांचेही आहे. माल खरेदीपासून विक्रीपर्यंतची पारदर्शकता आणि विश्वासावर संघाचा डोलारा उभा होता. पण, सर्वपक्षीय अराजकीय मंडळींच्या हातून संघाच्या दोऱ्या सुटल्या आणि अधोगतीला सुरुवात झाली.
साखर कारखाना तिथे पंप
शेतकरी संघ ही जिल्ह्यातील ताकदवान संस्था होती. त्यामुळे साखर कारखान्यांकडून कार्यस्थळावर पेट्रोलपंपासह शाखा सुरू करण्याचा आग्रह असायचा. एवढी मोठी गुंतवणूक व व्यवसायाची असल्याने कारखान्यांनी स्वत:ची जागा देऊन शाखा सुरू करण्यास सांगितले. संघाच्या विस्तारात हेही मुख्य कारण होते.
भरकटलेले जहाज..
संघाचा कारभार दृष्ट लागण्यासारखा होता; पण १९९९ पासून संघाचे जहाज भरकटण्यास सुरुवात झाली. ते गेली २५ वर्षे किनाऱ्यावर आलेच नाही.