शेट्टी-हाळवणकर यांच्यात दुरावा

By admin | Published: May 15, 2015 09:31 PM2015-05-15T21:31:59+5:302015-05-15T23:36:13+5:30

कुरघोडीचे राजकारण : भाजप-स्वाभिमानी संघटनेतील राजकीय स्थित्यंतराची परिणती

Shetti-Halvankar distracted | शेट्टी-हाळवणकर यांच्यात दुरावा

शेट्टी-हाळवणकर यांच्यात दुरावा

Next

राजाराम पाटील - इचलकरंजी -भाजपकडून राजकीय कोंडी होत असतानाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या भेटीप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर यांना साधे निमंत्रणही न देता खासदार शेट्टी यांनी प्रथमच स्थानिक राजकारणात कुरघोडी केली. त्यामुळे शहर व परिसरातील वस्त्रोद्योग व राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
इचलकरंजी लोकसभा व विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे खासदार शेट्टी व आमदार हाळवणकर यांची दुसरी टर्म आहे. दोन्हीही निवडणुकीत दोघांचीही भूमिका एकमेकाला पुरक अशीच राहिली आहे. गतवर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमध्ये आघाडी होती. लोकसभा निवडणुकीत हाळवणकर यांनी मतदारसंघात पदयात्रा व सभा घेऊन विधानसभा मतदारसंघ ढवळून काढला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांनीही हाळवणकर यांचा जातीने प्रचार केला आणि कार्यकर्तेही दिमतीला दिले होते.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागात दोघांचीही भूमिका समन्वयाची राहिली आहे. वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग या विषयांत तर खासदार शेट्टी हे आमदार हाळवणकर यांची एक तज्ज्ञ म्हणून नेहमीच मदत घेतात. आमदार हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास आघाडी इचलकरंजी नगरपालिका व चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी व तारदाळ येथे कार्यरत आहे. म्हणून शेट्टी यांनी शहर विकास आघाडी ‘त्रस्थ’ होईल, अशा राजकीय हालचाली कधीही केल्या नाहीत.
वरिष्ठ स्तरावरील राजकारणात मात्र भाजपकडून खासदार शेट्टी व त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चांगलीच कोंडी झाली आहे. केंद्रातील आणि राज्यातील मंत्रिपद, विधान परिषदेवरील सदस्यांच्या नेमणुका, शेतकऱ्यांचा नेता म्हणून उच्च पातळीवरून दखल घेणे, अशा परिस्थितीबाबत भाजपकडून ‘शेट्टीं’कडे दुर्लक्षच झाले आहे.
११ मे रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत खासदार शरद पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार प्रभाकर कोरे, नरेंद्र मुरकुंबी, मनोहर जोशी, आदींची साखर कारखान्यांच्या अडचणी व शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर या विषयांवर बैठक झाली. खासदार शेट्टी हे ऊसकरी शेतकऱ्यांचे नेते असूनही त्यांना डावलण्यात आले.
अशा पार्श्वभूमीवर गुरूवारी खासदार शेट्टी यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष तूपकर यांना वेताळ पेठेतील यंत्रमाग महामंडळाच्या कार्यालयात घेऊन आले. अध्यक्ष तूपकर यांनी पत्रकार बैठक घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. सुमारे दीड तासांहून अधिक वेळ तूपकर येथे होते; पण त्यांची भेट यंत्रमाग क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले आमदार हाळवणकरांशी घडवून द्यावी, असे काही खासदार शेट्टी यांना वाटले नाही आणि नेमकी हीच बाब राजकीय क्षेत्रात खटकली आहे. खासदार शेट्टी यांनी यंत्रमागाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या विषयावर आमदार हाळवणकर यांना डावलले आणि ‘भाजप’बाबत दुरावा स्पष्ट झाल्याची येथे जोरदार चर्चा आहे.

Web Title: Shetti-Halvankar distracted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.