दोन्ही कॉँग्रेससह भाजपकडून शेट्टींची कोंडी

By admin | Published: February 20, 2017 12:47 AM2017-02-20T00:47:06+5:302017-02-20T00:47:06+5:30

ंजिल्हा परिषद निवडणुका : ‘स्वाभिमान’ जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ते कामाला

Shetti Kondi from BJP with both Congress | दोन्ही कॉँग्रेससह भाजपकडून शेट्टींची कोंडी

दोन्ही कॉँग्रेससह भाजपकडून शेट्टींची कोंडी

Next


कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या पारंपरिक विरोधकांबरोबरच भाजप, शिवसेना या मित्रपक्षांनी कोंडी केली आहे. खासदार राजू शेट्टी यांना शिरोळ, हातकणंगले या बालेकिल्ल्यांतच रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा आक्रमकपणे राबवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचा जन्म झाला. गेली पंधरा-वीस वर्षे शेतीमालाच्या दरांसाठी रस्त्यांवर उतरून सरकारशी संघर्ष करण्याचे काम संघटनेने केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. ऊसदरासाठी टोकाचा संघर्ष करीत शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पाडून देण्यामध्ये संघटनेचे योगदान फार मोठे आहे. राज्य व केंद्रातील आघाडी सरकारविरोधात वातावरणनिर्मिती करीत सत्तांतर करण्यात संघटनेची भूमिका निर्णायक राहिली, हे नाकारता येणार नाही. खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह संघटनेच्या राज्यातील कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात प्रचाराचे रान उठविले. भाजप-शिवसेना सरकारकडून संघटनेने ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, त्यांपैकी काहींची पूर्तताही झाली. त्यामुळे उसाचे दोन हंगाम विनाकोंडीचे सुरू झाले; पण त्यानंतर सरकारची भूमिका काहीशी बदलत गेल्याने खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले. शेतकरीविरोधी भूमिका असेल त्या ठिकाणी त्यांनी सरकारला रोखण्याचे काम केले आणि तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खटकत गेले.
राजू शेट्टी व सदाभाऊ खोत हे दोन नेते संघटनेची ताकद आहेत, हे ओळखून भाजपने खोत यांना शेट्टी यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एकीकडे मित्रपक्ष म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद, पंचायत समितीत जागावाटपात जाणीवपूर्वक डावलण्याची खेळीही भाजप नेत्यांनी केली. शेट्टी यांनी शेतकऱ्यांचा ‘स्वाभिमान’ जिवंत ठेवत, ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे २२ हून अधिक उमेदवार उभे केले. भाजपने कुरघोडी करीत ‘स्वाभिमानी’च्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री पाटील यांनी सभांच्या माध्यमातून ‘स्वाभिमानी’च्या उमेदवारांसमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण शेट्टी यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबविल्याचे चित्र शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत दिसते.

Web Title: Shetti Kondi from BJP with both Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.