Lok Sabha Election 2019 : शेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:29 PM2019-03-29T16:29:08+5:302019-03-29T16:31:31+5:30
सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तो मान्यच करावा लागणार आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही आवाडे यांनी व्यक्त केली.
आवाडे म्हणाले, सांगली व कोल्हापूरच्या राजकारणाची एकमेकाशी सांगड आहे. त्याचे प्रत्यंतर २००९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही कॉँग्रेसला आले. त्यात बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसकडे पुणे, सोलापूर व सांगली हे तीनच मतदारसंघ आहेत. त्यातील सांगली द्यायचा म्हटला तर कॉग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान होणार, म्हणून या मतदारसंघ आपल्याकडेच रहावा, असा आग्रह होता.
कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचे काम केले. त्यातूनच राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरूवारी रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे व आपली चर्चा झाली. यामध्ये सविस्तर उहापोह झाल्यानंतर आपण सांगलीची जागा मागितली नव्हती.
तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शेवटचा पर्याय सांगली होता, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही जागा वाटपात वरिष्ठ पातळीवरून सांगली ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.
समन्वयाने जागेचा प्रश्न सुटल्याने सांगलीतील कोणीही कॉँग्रेसमध्ये जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पिटर चौधरी, एस. के. माळी आदी उपस्थित होते.
माझ्या परवानगीनेच बंड
राहूल आवाडे यांनी ‘हातकणंगले’तून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना आपली परवानगी घेतली होती. आमच्यामध्ये चर्चा होऊनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
जागा कायमस्वरूपी सोडलेली नाही
सांगलीची जागा आघाडीच्या तडजोडीत ‘स्वाभिमानी’ला सोडलेले आहे. याचा अर्थ कायस्वरूपी गेली असा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीत दिलेली जागा असल्याचे आवाडे यांनी सांगितले.