शेट्टी-आठवले यांना केंद्रात मंत्रिपद

By admin | Published: November 4, 2014 12:36 AM2014-11-04T00:36:05+5:302014-11-04T00:44:07+5:30

चंद्रकांतदादा पाटील : मंत्रिमंडळाचा विस्तार १५ नोव्हेंबरनंतर

Shetty-Athavale Minister in the Center | शेट्टी-आठवले यांना केंद्रात मंत्रिपद

शेट्टी-आठवले यांना केंद्रात मंत्रिपद

Next

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा विस्तार येत्या पंधरा नोव्हेंबरनंतरच होईल. तत्पूर्वी १२ तारखेला सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री व राज्यातही सत्तेत संधी दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
निवासस्थानी सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी व्हावे असाच आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या निर्णयाशी मंत्रिमंडळाचा विस्तार जोडला गेलेला आहे. शिवसेनेला १४ मंत्रिपदे हवी आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्यात कुणाला संधी मिळणार या आजच्याघडीला ‘जर-तर’च्या गोष्टी झाल्या आहेत. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली, तर भाजपला कमी मंत्रिपदे मिळतील. घटक पक्षांना आमदार निवडून आणता आले नसले तरी त्यांच्यामुळे भाजपचे आमदार निवडून येण्यात मोलाची मदत झाली हे भाजप कधीच नाकारत नाही म्हणूनच शेट्टी व आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार सुरू आहे. केंद्रात सत्तेत सहभागी करून घेतल्यावर त्या पक्षांना पुन्हा राज्यात किती मंत्रिपदे द्यायची याचा निर्णय चर्चेतून घेऊ.
प्रत्येक मतदान बूथला एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बूथप्रमुखाची चिठ्ठी आणल्याशिवाय कुणाचेही स्थानिक पातळीवरील काम करायचे नाही, असे आम्ही ठरविले आहे. कार्यकर्त्याला सन्मान द्यायचा म्हणून असा निर्णय घेतला असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.
महापालिकेतही युती..
राज्यात भाजपसोबत शिवसेना सत्तेत सहभागी झाला, तर मग पुढील वर्षी होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढविण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या सगळ्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढविण्याचे आमचे धोरण असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Shetty-Athavale Minister in the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.