शेट्टी-दिलीप तात्यांमध्ये गुफ्तगू
By admin | Published: September 21, 2015 10:51 PM2015-09-21T22:51:19+5:302015-09-22T00:11:32+5:30
स्वाभिमानी-राष्ट्रवादीचा नवा शिष्टाचार : जिल्हा बँकेत सूर जुळले
सांगली : वर्षानुवर्षे ऊस दराच्या प्रश्नावरून एकमेकांविरोधात लढणारे स्वाभिमानी शेतकरी व राष्ट्रवादीचे नेते आता राजकीय शिष्टाचाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जिल्हा बँकेतील गणरायाच्या आरतीला उपस्थिती लावून बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यांच्यातील ‘गुफ्तगू’ राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय कडवटपणा आहे. उसाच्या प्रश्नावर तो दिवसेंदिवस वाढत गेला. यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्लेसुद्धा झाले. इतका टोकाचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने विशेषत: वाळवा तालुक्याने अनुभवलेला असताना, आता हे दोन्ही पक्ष राजकीय शिष्टाचाराच्या वाटेवरून नवा अध्याय मांडत आहेत. स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत आले होते. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. दिलीपतात्या हे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात, तर जयंत पाटील स्वाभिमानीचे कट्टर विरोधक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे ती चर्चा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. सदाभाऊ खोत यांच्यानंतर ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनीही सोमवारी जिल्हा बँकेत हजेरी लावली. त्यांनीही बंद खोलीत दिलीपतात्यांशी मनमोकळी बातचित केली. चर्चा काय झाली याचा तपशील कळाला नसला तरी, त्यांचा हा संवादच अनेकांना आश्चर्यात टाकणारा ठरला. दिलीपतात्यांच्यामते सदाभाऊ खोत त्यांचे चांगले मित्र आहेत. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी, व्यक्तिगत पातळीवर आपले चांगले संबंध असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. दिलीपतात्यांचे हे स्पष्टीकरण राजकीय चतुराईचे उदाहरण आहे, की नव्या बदलाची नांदी, याचे कोडे स्वाभिमानीच्या तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अद्याप उलगडलेले नाही. कार्यकर्त्यांमधील हा संभ्रम कायम ठेवत आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवा अध्याय मांडला जात आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)
त्यांनी खासदार म्हणून स्वीकारले आहे!
पत्रकारांनी शेट्टी यांना या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले की, खासदार म्हणून दिलीपतात्यांनी मला स्वीकारले आहे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना स्वीकारले आहे. तात्त्विक मतभेद असणारच आहेत. ज्यावेळी तत्त्वाचा विषय येईल, तेव्हा आम्ही आमच्या तत्त्वाशी ठाम राहू.