Lok Sabha Election 2019 हॅटट्रीकसाठी शेट्टी कुटुंबीयांनी कंबर कसली --कुटुंब रमलंय राजकारणात-राजकीय आखाडा:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:41 AM2019-04-08T11:41:46+5:302019-04-08T11:45:33+5:30
हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रचारात सक्रीय दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत हॅटट्रीक करण्यासाठी साऱ्या शेट्टी कुटुंबीयांनी कंबर कसली आहे. पत्नी, मुलगा, भाऊ हे नातेवाईक थेट प्रचारात उतरले असून, चळवळीतील प्रमुख शिलेदारही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसते.
शेट्टी हे शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांचा हायटेक प्रचाराला फाटा असतो. शेट्टी यांचे राजकारणच चळवळीतून पुढे आले आणि त्याला बळ मिळाल्याने शेतकरी हेच त्यांचे प्रचारक आहेत. शेट्टी लोकसभेच्या तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. गेल्या १0 वर्षांत ऊस व दूध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क आहे. त्यांच्या पत्नी संगीता शेट्टी याही शिरोळसह शेजारील तालुक्यात आंदोलनाच्या माध्यमातून संपर्कात असतात. मुलगा सौरव व भाऊ सुभाष शेट्टी हेही प्रचारात सक्रीय आहेत.
उमेदवार : राजू शेट्टी (पक्ष : स्वाभिमानी शेतकरी संघटना)
गेले २0 वर्षे सक्रीय राजकारणात आहेत. विद्यमान खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार म्हणूनही त्यांनी काम केले.
पत्नी : संगीता शेट्टी
स्वतंत्र व्यासपीठ नसले तरी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून त्या राजकारणात सक्रीय आहेत. गेले १0 वर्षे त्या चळवळीच्या महिला आघाडीची जबाबदारी सांभाळत आहेत.
मुलगा : सौरव
गेल्या दोन-तीन वर्षांपासून सौरव ऊस व दूध आंदोलनातून चळवळीत सक्रीय आहेत. संघटनेतील युवकांची मोट बांधत त्यांना सक्रीय करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते शिरोळ, हातकणंगले, वाळवा तालुक्यातील प्रचाराची यंत्रणा राबवितात.
भाऊ : सुभाष
सुभाष शेट्टी हे सक्रीय राजकारणात नसले तरी राजू शेट्टी यांच्या एकूणच चळवळीच्या वाटचालीतील पडद्यामागील भूमिका ते पार पाडतात. २००२ पासूनच्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते शेट्टी यांच्यासाठी जोडण्या लावण्यात आघाडीवर असतात.