सावलीच्या बंडाने शेट्टी घायाळ, कार्यकर्ते सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 05:00 PM2020-06-19T17:00:27+5:302020-06-19T17:02:09+5:30
प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस्थेत आहेत.
कोल्हापूर : प्रा. जालंधर पाटील आणि सावकर मादनाईक हे राजू शेट्टी यांची सावलीच. गेली पंचवीस वर्षे अनेक चढउतारांत ही सावली कायम शेट्टी यांच्यासोबत राहिली; पण आता विधान परिषदेच्या निमित्ताने या सावलीनेच बंड केल्याने शेट्टी घायाळ झाले आहेत; तर कार्यकर्तेही सैरभैर अवस्थेत आहेत.
गुरुवारी कार्यकर्त्यांची मादनाईक आणि पाटील यांच्या घरी समजूत घालण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. या सर्व प्रकाराने उद्विग्न झालेले शेट्टी हे फोन बंद ठेवून दैनंदिन कामासाठी बाहेर पडले. पन्हाळ्यातील केखले येथील आजारी कार्यकर्त्याच्या विचारपूस करण्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. स्वत: दु:खात असतानाही या दौऱ्याने शेट्टी यांच्यातील लढाऊ बाणा पुन्हा एकदा सिद्ध झाला.
दरम्यान, शेट्टी यांनी आमदारकीची ब्यादच नको म्हणून विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्याचा निर्णय फेसबुकवरील पोस्टद्वारे जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या घरी धाव घेतली. ह्यतुम्हीच आमदार व्हा, माघार घेऊ नका,ह्ण असा आग्रह त्यांच्याकडून सुरू होता; पण शेट्टी यांनी ह्यकार्यकर्त्यांच्या मतापलीकडे मी नाही. ते जो निर्णय देतील तो मान्य असेल,ह्ण असे सांगत दौऱ्यासाठी बाहेर पडणे पसंत केले.
गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या इचलकरंजी पाणीप्रश्नावरील बैठकीत त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर दवाखान्यात उपचार घेत असलेले हातकणंगलेचे माजी सभापती राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पन्हाळा तालुक्यातील माले व पोखले येथे सांत्वनपर भेट दिल्यानंतर केखले येथील संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेले नरके मामा यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांची भेट घेऊन त्यांच्याही प्रकृतीची विचारपूस केली.
मादनाईक यांची नाराजी कायम
सावकर मादनाईक यांनी बंडाची भाषा केल्यानंतर त्यांची समजूत घालण्यासाठी कार्यकर्त्याची घरी रीघ लागली होती, त्यावर मी चळवळ सोडणार नाही, संघटनेतच काम करणार आहे,ह्ण असे स्पष्ट करतानाच ह्यपदाची अपेक्षा केली हे चुकले काय? अशा शब्दांत आपली नाराजी कायम असल्याचे सांगितले.
दोन वेळा आमदारकी लढवूनही पराभूत व्हावे लागल्याने पद मिळावे अशी अपेक्षा होती. शेट्टींना विरोध नाही, त्यांना शुभेच्छा आहेत; पण त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना आपला निर्णय राखून ठेवला आहे, वेळ आल्यावर कळेल, अशी गुगलीही टाकली आहे.
घरातला वाद आहे, घरातच मिटेल
बंडाचे निशाण फडकवणारे प्रा. जालंदर पाटील यांनी गुरुवारी काहीसे नमते घेत ह्यहे घरातले वादळ आहे, घरातच मिटेल, असे सांगून चळवळीत सक्रिय राहणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची मते अजमावली जात आहेत. आमचा शेट्टी यांच्या आमदारकीला विरोध नाही, फक्त आम्ही अपेक्षा व्यक्त केली. इतकी वर्षे चळवळीत कायम करत आहे म्हटल्यावर पदाची अपेक्षा ही असणारच. यावर आता स्वत: शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्याशी चर्चा करून जे ठरेल त्याला पाठिंबा असणार आहे, असेही प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले.