शेट्टी छोटे मियाँ, खोतांची नौटंकी
By Admin | Published: April 25, 2017 05:31 PM2017-04-25T17:31:57+5:302017-04-25T17:31:57+5:30
विखे-पाटील यांची सडकून टीका
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर दि. २५:: शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर मोठे झालेले खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत सत्तेत गेल्यापासून शेतकऱ्यांना विसरले आहेत. सत्तेत राहायचं आणि शेतकऱ्यांसाठी काहीच करायचं नाही, असंच त्यांचं धोरण आहे. त्यामुळे शेट्टी हे सरकारमधील छोटे मियॉँ आहेत तर मंत्री खोत भाजी खरेदीची नौटंकी करत आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेट्टी-खोत यांच्यावर टीका केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील लक्ष्मी-विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू जन्मस्थळापासून सुरू केला. त्यानिमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार राजू शेट्टी यांचे मला आश्चर्य वाटतंय. सत्तेत राहायचं आणि शेतकऱ्यांसाठी काहीच करायचं नाही. याबाबतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बडे मियॉँ आहेत तर खासदार शेट्टी छोटे मियॉँ आहेत. मंत्री सदाभाऊ खोत यांनी तर भाजी खरेदीची नौटंकी केली आहे. शेट्टी व खोत यांनी इव्हेंट मॅनेजमेंट सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढल्यामुळे शेतकऱ्यांवर भुरळ पडली; परंतु ज्या गतीने त्यांना शेतकऱ्यांनी उचलून घेतले तेवढ्यात गतीने खाली खेचतील यात शंकाच नाही, असे विखे-पाटील म्हणाले.शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाला पाहिजे आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळेल एवढा भाव मिळावा, अशा आशयाचे ठराव १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी ठराव करावेत तसेच ते राज्य सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विखे-पाटील यांनी यावेळी केले.
राज्य सरकार वेडं : पवार
सरसकट कर्जमाफी देण्यात अर्थ नाही, या सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, हे सरकार वेडं असल्याचा आरोप केला. ज्यांनी कर्ज भरले आहे त्यांचे कर्ज माफ करण्याचा प्रश्नच येत नाही; परंतु ज्यांचं थकलंय, जे संकटात आहेत अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेच पाहिजे, असे पवार म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत ३१ लाख शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटींचे कर्ज माफ करावे लागेल, असे सांगितले होते. हा आकडा आला कुठून? सरकारने माहिती घेतली आहे, हेच यावरून स्पष्ट होते म्हणून ज्यांची कर्जे थकलेली आहेत, त्यांचीच कर्जे माफ करावीत, अशी आमची मागणी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशात जर कर्जमाफी होत असेल तर मग महाराष्ट्रात का होत नाही, असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.
तूर खरेदी केंद्रे सुरू करावी
पंतप्रधान लाल किल्ल्यावरून तूर उत्पादन घेण्याचे आवाहन करतात. शेतकरी त्याला प्रतिसाद देऊन तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो. आता उत्पादन वाढले आहे. सरकारने तूर खरेदी केली आणि बंदही केली. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करावी, अशी मागणीही यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केली.
तूर खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला, असा आरोप पवार यांनी केला. शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांनी खरेदी केलेली तूर व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’ला ५०५० रुपयांना विकली. त्यामध्ये १५०० रुपयांचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला. कच्ची साखर आयातीचा फायदाही व्यापाऱ्यांनाच होणार आहे. सरकार शेतकऱ्यांसह मतदारांचीही टिंगल-टवाळी करत आहे, असे पवार म्हणाले तर तूर खरेदी बंद करून व्यापाऱ्यांना लूटमार करण्याचा परवानाच दिल्याची टीका विखे-पाटील यांनी केली.
हा सरकारचा दांभिकपणा : चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजप सरकारवर टिका केली. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता आश्वासनांची पूर्तता करायची वेळ आली तर चालढकल करत आहे. सरकारचा हा दांभिकपणा आहे, असे चव्हाण म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार सुनील केदार, आमदार विद्या चव्हाण, आमदार संध्याताई कुपेकर, रामहरी रूपनावर, प्रकाश गजभिये, प्रमोद ंिहंदुराव, निवेदिता माने, महापौर हसिना फरास, ए. वाय. पाटील. आर. के. पोवार, राजू लाटकर, तौफिक मुल्लाणी, सुरेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)