शेट्टी, महाडिक, सतेज पाटील यांच्यात जुगलबंदी-तिघांचे एकमेकांना टोमणे-साधली प्रचाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:07 AM2018-11-23T10:07:12+5:302018-11-23T10:09:25+5:30
रेशनधारकांनी गुरुवारी कोल्हापुरात काढलेल्या विराट मोर्चाने प्रशासनाला कितपत धडकी भरवली, हा भाग वेगळा, पण प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र तातडीने मोर्चाचे व्यासपीठ गाठत पाठिंबा जाहीर करत, प्रचाराची आयती संधी साधली
कोल्हापूर : रेशनधारकांनी गुरुवारी कोल्हापुरात काढलेल्या विराट मोर्चाने प्रशासनाला कितपत धडकी भरवली, हा भाग वेगळा, पण प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र तातडीने मोर्चाचे व्यासपीठ गाठत पाठिंबा जाहीर करत, प्रचाराची आयती संधी साधली. या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आलेल्या खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांनी भाषणातून मारलेल्या टोमण्यांमुळे राजकीय जुगलबंदीचा अनुभव उपस्थितांनी घेतला.
रेशन बचाव समितीने काढलेला मोर्चा अपेक्षेपेक्षाही अतिभव्य झाला. जिल्ह्यातील सर्व भागांतून रेशनधारक यात सहभागी झाल्याने कोल्हापूर गर्दीने तुंबून गेले. मोर्चा ऐन भरात असताना, आमदार हसन मुश्रीफ यांच्या वतीने नवीद मुश्रीफ व भैय्या माने यांनी व्यासपीठावर येऊन पाठिंबा दर्शवला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी थेट व्यासपीठावर एन्ट्री केली. पाठोपाठ पाच मिनिटांच्या अंतराने आमदार सतेज पाटील हे दाखल झाले. आणखी थोड्या वेळाने खासदार राजू शेट्टींचेही आगमन झाले. मोर्चा संपत असतानाच माजी आमदार पी. एन. पाटील यांचा निरोप घेऊन गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे व अरुण डोंगळे हेदेखील व्यासपीठावर आले. भाजप वगळता सर्व पक्षांच्या आमदारांचे प्रतिनिधित्व करणारे कार्यकर्ते व्यासपीठावर दाखल झाले. या सर्वांनी तुमच्या पाठीशी आहोत, असे सांगत लढ्याला पाठिंबा दर्शवला.
पाठिंब्यावरून सभेत राजकीय नेत्यांची गर्दी झाली, तरी सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी मी शब्द देणारा खासदार आहे, नुसता बोलणारा नव्हे, तर करून दाखविणारा आहे. मी संसदेत काय बोलतो, याची क्लिपदेखील तुमच्या मोबाईलवर पाठवतो, असे सांगून चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. महाडिक परिवार तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात लोकसभेत प्रश्न मांडून कोण ऐकणार नाही.
खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी याच न्यायाने येथून पुढे परिवर्तनाची लढाई लढावी लागेल. आता लढण्यासाठी तलवार काढलीच आहे, तर ती खाली ठेवायची नाही. रात्री १२ वाजता जरी बोलावले, तरी बंटी पाटील तुमच्या मदतीला येईल, असे सांगून महाडिकांवर कडी करण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या जुगलबंदीने उपस्थितांचे मनोरंजन केले असताना, त्यात खासदार राजू शेट्टी यांनीही उडी घेतली. भाषण करून क्रांती होत नाही, प्रश्न सुटत नाहीत. वेळप्रसंगी नरड्यावर पाय ठेवण्याची तयारी ठेवावी लागते, याचेही भान ठेवावे, असा टोमणा मारला.
सतेज पाटील व धनंजय महाडिक एकापाठोपाठ व्यासपीठावर आले. व्यासपीठावर या दोघांच्यामध्ये चंद्रकांत यादव बसले होते. या दोघांनी एकमेकांकडे साधा कटाक्षसुद्धा टाकला नाही. मोर्चा संपल्यानंतर महाडिक निघून गेले, पण सतेज पाटील व राजू शेट्टी हे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले. तेथून बाहेर पडल्यानंतर सतेज पाटील यांच्या गाडीतूनच शेट्टी निघून गेले.