शेट्टी-सदाभाऊ एकत्र, पण अबोला कायम!
By admin | Published: March 14, 2017 12:23 AM2017-03-14T00:23:25+5:302017-03-14T00:23:25+5:30
इस्लामपुरात कार्यक्रम : दोघांमध्ये अंतर पडणार नसल्याचा निर्वाळा; तरीही संघर्षाच्या चर्चेला उधाण
इस्लामपूर : शेतकऱ्यांसाठीच्या संघर्षाची जबाबदारी मी पार पाडणार, तर सदाभाऊ खोत सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदतीची जबाबदारी पार पाडतील. आम्हा दोघांची संघर्ष आणि विकासाची चाके एकसमान चालतील. त्यामध्ये अंतर पडणार नाही, असा निर्वाळा स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. मात्र व्यासपीठावर एकत्र बसूनही दोघांमध्ये अबोला राहिल्याने शेट्टी-खोत एकीकरणाबाबतचे प्रश्नचिन्ह मात्र कायम राहिले.
येथे रविवारी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील रयत विकास आघाडीच्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारांचा सत्कार, खा. शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना सिंहाच्या छाव्यांची संघटना आहे. त्यामुळे छावे एकमेकाला ओरखडे मारणारच. मात्र ते एकमेकांच्या नरडीचा घोट घेणार नाहीत. चळवळीतून स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, विचारांची ताकद मिळते आणि ते संघटनेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील शंका निघून जातील.
ते म्हणाले की, मी सामान्य कुटुंबातून पुढे आलो आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न कधीही विसरू शकत नाही. वैचारिक मतभेद असले तरी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि राष्ट्रवादीच्या झुंडशाहीविरुध्द आम्ही एकत्र येणारच. असत्य आणि अन्यायाविरोधातील ही लढाई नेटाने लढू. पूर्वी सदाभाऊ आक्रमक व्हायचे, आता मी आक्रमक झालो आहे. सदाभाऊ सरकारमध्ये आहेत. संसदीय प्रथा-परंपरा पाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी आक्रमक राहणार आहे. सरकार आणि सत्तेत असलो तरी संघर्ष चुकलेला नाही. उत्तरप्रदेशमध्ये जशी कर्जमाफीची हमी दिली, तसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, त्यासाठी पाठपुरावा करू. मागितल्याशिवाय सरकार काही देत नाही, याची जाणीव आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, जी माणसे लढाऊ असतात, ती जिवंत असतात आणि त्यांचीच चर्चा होते. आम्ही सर्व एक आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढायचे, तुरुंगात बसायचे मला माहीत आहे. कोणाचे वाईट चिंतून मी पुढे जाणार नाही. विकास आघाडी एकसंध आहे आणि पुढील लक्ष्य इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे राहील.
ते म्हणाले की, निवडणुका संपल्या आहेत. काँग्रेसनेच आमचे उमेदवार पाडण्याचे कारस्थान केले. आता सत्तेच्या भिकेचा कटोरा घेऊन आमच्या दारात कशाला येताय? जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येऊ देणार नाही. त्यांची मक्तेदारी मोडून काढू.
यावेळी आमदार नाईक, नानासाहेब महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, नगरसेवक विक्रम पाटील यांची भाषणे झाली.
सम्राट महाडिक प्रास्ताविकात म्हणाले की, काँग्रेस व शिवसेनेमुळे आमच्या पंचायत समितीच्या सहा व जिल्हा परिषदेच्या दोन जागा गेल्या. अन्यथा पूर्ण बहुमत मिळवत होतो. ग्रामीण भागात १० हजार मतांची आघाडी मिळाली आहे. विधानसभा निवडणूकही संघटित ताकदीने लढवू. सागर खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)
मौन कायम
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये वादग्रस्त वक्तव्यांचे वाक्युध्द रंगल्याने दोघांमध्ये मतभेद असल्याची उघड चर्चा सुरु झाली. त्यानंतर दोघे मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच एका व्यासपीठावर आले. दोघांनी मतभेद नसल्याचे जाहीर केले. मात्र शेजारीशेजारी बसूनही दोघांनी धरलेले मौन काही सुटले नाही. शेवटी दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत एकमेकांकडे बघत केवळ स्मितहास्य केले.
शब्द आणि चाबूक
मेळाव्यात प्रत्येक वक्त्याकडून राष्ट्रवादी आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार होत होता. जसे शब्दांचे फटकारे बसत होते, तसे एक वयोवृध्द कार्यकर्ते चाबकाचे आसूड ओढत होते. या आसूडाचा आवाज सबंध मेळाव्याच्या जल्लोषातही कडाडत होता. यापूर्वीही शेट्टींच्या अनेक कार्यक्रमात या कार्यकर्त्याने आसूडासह हजेरी लावली आहे.